भारतीय हवाई सीमांचे संरक्षण असो वा पूर, भूपंक, त्सुनामी, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपदेत देशवासियांच्या सेवेत सदैव तत्पर आणि कर्तव्यदक्ष असलेल्या भारतीय हवाई दलास मायेने संगोपन आणि तितक्याच शिस्तबद्धतेने दुरुस्त ठेवण्याची मोठी जबाबदारी नागपुरातील हवाई दलाचे मेन्टनन्स कमांड करीत आहे. त्या अर्थाने मेन्टनन्स कमांड हे हवाई दलाचे ‘मदर कमांड’ ठरले आहे. भारतीय हवाई दलास उद्या, बुधवारी ८२ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हवाई दलाच्या देशभरातील सातही कमांडमध्ये आठवडभरापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
हवाई दलाचे देशभरात पाच ऑपरेशनल कमांड आणि एक ट्रेनिंग कमांड आहे. या संपूर्ण कमांडला, विमान, हेलिकॉप्टर, रडार आणि तांत्रिक मदत नागपुरातील मेंटनन्स कमांड करीत असते. भौगौलिकदृष्टय़ा देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहरात या कमांडचे मुख्यालय असून, त्याचे देशभरात विविध ठिकाणी असलेल्या बेस रिपेअर डेपो आहेत. नागपुरातील मुख्यालयात प्रामुख्याने पॉलिसी आणि प्लॅनिंगचे काम होते. हवाई दलातील युद्धविमाने, हेलिकॉप्टर, रडार, पॅराशुट आदींची उपलब्धता, त्याची देखभाल दुरुस्ती, निगा सारखी सर्व महत्त्वाच्या कामांचे नियोजन नागपुरात मुख्यालयात होत असते.
विमानांची मोठी दुरुस्ती आणि ठराविक काळात केली जाणारी संपूर्ण देखभाल दुरुस्ती केली जाते. याशिवाय ग्राऊंड एन्व्हारमेंट सिस्टम, एसएजीडब्ल्यू सारख्या मिसाइल आणि एअर डिफेन्स रडार दुरुस्ती करण्यात येते. या कमांडमार्फत मोठा साठा आणि हवाई दलाच्या सर्व उपकरणे, सुटे भाग आणि फिल्ड इन्फारमेशन पुरविली जाते. युद्धविमानांचा सुटय़ा भागांचे, मिसाइल, रडार, विमानांना सहाय्यक वाहने आणि ग्राऊंड सपोर्ट सिस्टमचे स्वदेशीकरण करण्याची मोठी जबाबदारी या कमांडवर आहे.  त्यामुळे मेंटनन्स कमांड ‘मदर कमांड ऑफ एअर फोर्स’ असल्याचे विंग कमांडर अशोक मोटे (निवृत्त) म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भात कमांड मुख्यालय
मेंटनन्स कमांड १९५५ ला कानपूर येथे स्थापन करण्यात आले आणि त्याचे मुख्यालय १९६३ ला नागपुरात स्थानांतरित करण्यात आले. तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात या कमांडचे मुख्यालय आणण्याचे ठरविले होते. हे कळताच तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी विदर्भात स्थापनेच्या प्रस्ताव केंद्राकडे सादर केला, असे तत्कालीन नागपूर विभागीय माहिती अधिकारी श्रीधर सहस्त्रभोजने यांनी सांगितले.
रेल्वे प्रवासात कमांडच्या जागेचा मार्ग मोकळा
नागपूरचे तत्कालीन पालक मंत्री शेषराव वानखेडे मुंबई-नागपूर रेल्वेने येत असताना त्यांची भेट हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याशी झाली. या अधिकाऱ्याने नागपुरात मेंटनन्स कमांडच्या मुख्यालयासाठी जागा मिळत नसल्याचे वानखेडे यांना सांगितले. त्यानंतर वानखेडे यांनी त्या अधिकाऱ्याला सर्किट हाऊसमधील कॉटेजमध्ये भेटावयास बोलावले आणि बोरवन म्हणून प्रसिद्ध असलेली जागा मुख्यालयासाठी उपलब्ध करून दिली. अशाचप्रकारे एअर कमांड हाऊसचा प्रश्नदेखील सोडविण्यात आला, असे नागपूरच्या पहिल्या महिला महापौर कुंदा विजयकर यांनी सांगितले. या कमांडचे पहिले प्रमुख एअर व्हाईस मार्शल हरजिंदरसिंग होते. नागपुरात मुख्यालय आल्यानंतर कमांडचे पहिले प्रमुख म्हणून एअर मार्शल ओ.पी. मेहरा यांना मिळाला.

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian air force mother command in nagpur
First published on: 08-10-2014 at 08:19 IST