शहरातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून दिवसाढवळ्या महिला व गोरगरिब जनतेवर गुंड प्रवृत्तीकडून अन्याय अत्याचार होत असल्याचा आरोप खासदार रावसाहेब दानवे यांनी केला.
जालना शहरातील लालबाग, हनुमान घाट, खांडसरी, भगतसिंग चौक भागामधील ४००-५०० महिला-पुरुषांनी आपल्या कार्यालयात येऊन गुंडांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी केल्या. दिवसा घरात घुसून शिवीगाळ, मारहाण, लुटमार, जीवे मारण्याची धमकी, महिलांची छेडछाड आणि त्यांच्याशी असभ्य वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी महिला-पुरुषांनी केल्या. विरोधात बोलल्यास तलवारीने हल्ला करण्यात व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने महिलांना या भागात राहणे कठीण झाले आहे. तक्रार केल्यास पोलीस आरोपींविरुद्ध कारवाई करण्याऐवजी फिर्यादीलाच दमदाटी करतात. या आरोपीविरुद्ध अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्य़ांची नोंद पोलिसांमध्ये असल्याचे दानवे यांनी सांगितले. सय्यद रफीक सय्यद इसाक, सय्यद शफीक सय्यद इसाक, सय्यद तौफीक सय्यद इसाक, सय्यद अतीक सय्यद इसाक आणि शेख शकील शेक खालेद उर्फ बिल्ला अशी या आरोपींची नावे असल्याचे दानवे यांनी सांगितले. या आरोपींच्या विरोधात आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करणार आहोत. कारवाई न झाल्यास अन्याय झालेल्या नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दानवे यांनी दिला.