महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त व विभागीय अधिकारी पदांसाठी सरळसेवा पध्दतीने भरतीसाठी अर्ज केल्यावर अनुसूचित जाती गटात आपली निवड करण्यात आली असून या पदावर अन्य उमेदवार पालिका महासभेत झालेल्या बेकायदेशीर ठरावाच्या आधारे हक्क सांगण्याचा तसेच आपलीच निवड झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नरेंद्र कचेश्वर दाणी यांनी केला आहे.
यासंदर्भात आपण पालिका आयुक्तांना २० मे २०१३ रोजी निवेदन दिले असून दहा वर्षांपासून आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असल्याचा दाणी यांचे म्हणणे आहे. सरळसेवा पदाच्या भरतीसाठी २० सप्टेंबर २००० रोजी प्रसिध्द झालेल्या जाहिरातीनुसार दाणी यांनी अर्ज केल्यावर सहा जून २००३ रोजी मुलाखतीसाठी त्यांना बोलविण्यात आले. लेखी परीक्षा, मुलाखत व शैक्षणिक अर्हता या निकषावर सर्वसाधारण गटात नितीन नेर व अनुसूचित जाती जमाती गटातून आपली निवड झाली. परंतु या जागा सरळसेवेने भरावयाच्या की पदोन्नतीने या वादामुळे आपणास नियुक्तीपत्र मिळू शकले नाही, असे दाणी यांनी म्हटले आहे. आपण सेवेत असलेल्या एसटी महामंडळातील एका किरकोळ प्रकरणाच्या आधारे आपली बदनामी करण्याचा व त्यानिमित्ताने डावलण्याचा प्रयत्न झाला.
वास्तविक आपणास एसटी महामंडळात दोनदा पदोन्नती देण्यात आली असून सध्या आपण वाहतूक निरीक्षक (वाणिज्य) म्हणून कार्यरत आहोत. अनुसूचित जाती गटातील अन्य एका उमेदवाराने २० जानेवारी २०११ रोजी महासभेत झालेल्या ठरावाच्या आधारे आपलीच या पदावर निवड झाल्याचा देखावा उभा केला. वास्तविक उच्च न्यायालयाने हा ठराव बेकायदेशीर ठरविला असल्याचा दावा करून आपल्याला ताबडतोब या पदावर नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.