पुणे पोलिसांनी दिलेल्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सीताबर्डीवरील सिनेमॅक्समध्ये चित्रपट पाहत असलेल्या आंतरराज्यीय बॅग लिफ्टर टोळीला हुडकून अटक केली.
तामिळनाडूमधील चित्री गावातील ही टोळी आहे. पुणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील पवार हे या टोळीच्या मागावर होते. ही टोळी काल नागपुरात असल्याचे समजताच त्यांनी नागपूरला गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील कोल्हे यांना ही माहिती तात्काळ कळविली. सुनील कोल्हे, पोलीस निरीक्षक माधव गिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी नागपुरात या टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली. एम्प्रेस सिटी मॉलसमोर ही टोळी असल्याचे समजताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच ही टोळी तेथून पसार झाली होती. त्यानंतर ही टोळी सीताबर्डीवरील सिनेमॅक्समध्ये असल्याची खबर लागताच पोलिसांनी सावध पावले उचलली. साध्या वेषातील पोलिसांनी सिनेमॅक्सला घेरले. प्रवेशद्वाराबाहेर तसेच आत साध्या वेषातील पोलीस तैनात करण्यात आले.
साध्या वेषातील पोलिसांपैकी कुणी पॉपकॉर्न विकत होते तर कुणी इतर वस्तू. तेथील गर्दीत नेमके आरोपींना कसे शोधायचे असा प्रश्न होता. पुणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सतत संपर्कात राहून नागपूर पोलिसांना मदत केली. त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिनेमॅक्समध्ये आरोपींचा शोध सुरू केला. विश्वरुपम व रेस-टू हे दोन चित्रपट यावेळी सुरू होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक-एक संशयिताला उचलणे सुरू केले. विश्वरुपम पहात असलेल्या तसेच त्यानंतर रेस-टू पहात असलेल्या मुख्य सूत्रधारासह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सावधगिरी बळगली तरी थोडा गोंधळ झाला. एकूण पाच आरोपी हाती लागले. तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींना पकडल्याचे दिसल्यानंतर नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य केले.
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यात ही टोळी कार्यरत असते. शहरात काही ठिकाणी बॅग लिफ्टिंग केल्यानंतर टोळी दुसऱ्या शहरात बस्तान हलविते. रोख १८ हजार ५००, मोबाईल, पेनड्राईव्ह व पर्स आरोपींजवळून जप्त करण्यात आली. या टोळीने मुंजे चौकात सोमवारी एका कारमधून रक्कम लंपास केल्याचे उघड झाले. आरोपी तामीळ भाषा बोलत असल्याने पुढील तपासासाठी पोलिसांनी मध्यस्थाची मदत घेतली आहे.