तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत तहसील विभागाने योग्य नियोजन न केल्याने एकच गोंधळ उडाला. निवडणूक अधिकाऱ्यांना तहसीलदारांकडून भिन्न आदेश मिळाल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान जातपडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आल्याने अनेक उमेदवारांचे मनसुबे उधळले गेले. छाननी प्रक्रियेत जात पडताळणीअभावी अनेक उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्याने अनेक जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना काही निवडणूक अधिकाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीने घेतले. तर, काही अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र नसतानाही अर्ज दाखल करून घेतले. अर्ज नामंजूर करण्यात आल्यावर अनामत रक्कम परत देणे आवश्यक असताना ती परत देण्यात न आल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.