नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादन प्रक्रिया रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू असून त्यांनी त्यांना अॅवॉर्ड दिल्यानंतर तात्काळ साडेबावीस टक्के भूखंड वाटप केले जाणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असून सिडकोचा त्यामागे पाठपुरावा सुरू आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रकल्पग्रस्तांच्या हाती भूखंड आणि इतर सुविधांचे पॅकेज पडण्यास सुरुवात होईल, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी स्पष्ट केले. ‘विमानतळ प्रकल्पग्रस्तांची दिवाळी कोरडी’ या ‘महामुंबई वृत्तांत’मधील बातमीवर त्यांनी सदर स्पष्टीकरण केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीतील एक-एक अडसर आता दूर होत असून या प्रकल्पाला प्रमुख अडथळा ठरू पाहणाऱ्या दहा गावांतील बहुतांशी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमीन देण्यास व इतरत्र स्थलांतरित होण्यास संमती दिली आहे. देशातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांची ६७१ हेक्टर जमीन लागणार आहे. संमतिपत्र मिळाल्यानंतर सिडको तात्काळ साडेबावीस टक्के योजनेचे भूखंड व पॅकेजमधील इतर सुविधा देण्यास प्रारंभ करेल असे वातावरण तयार करण्यात आले होते. त्यामुळे तीन हजार प्रकल्पग्रस्तांपैकी ८० टक्के प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतरित होण्यास व जमीन देण्यास संमतिपत्रे दिलेली आहेत. त्यात मुंबई उच्च न्यायालयाने संमतिपत्र देण्यास ६ सप्टेंबर ही मुदत घालून दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी तात्काळ ही संमतिपत्रे दिली; पण ज्या वेगाने प्रकल्पग्रस्तांनी संमतिपत्रे दिली त्या वेगाने सिडको त्यांच्या पॅकेजमधील भूखंड देण्यास हालचाल करीत नसल्याची एक बातमी ‘महामुंबई वृत्तांत’ने दिवाळीपूर्वी प्रसिद्ध केली होती. सिडकोकडे अॅवॉर्ड कॉपी प्राप्त झाल्याशिवाय सिडको काहीही करू शकणार नाही. ‘इस हात से दो इस हात लो’ या भूमिकेवर सिडको आजही कायम असून अॅवॉर्ड कॉपी हा प्रकल्पग्रस्तांचा सक्षम पुरावा आहे. अॅवॉर्ड कॉपी तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून १५ डिसेंबपर्यंत अॅवॉर्ड प्राप्त होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या हाती ज्या वेळी अॅवॉर्ड पडतील त्या वेळी क्षणाचीही उसंत न घेता विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे साडेबावीस टक्के योजनेतील भूखंड वाटप केले जाणार आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालय अॅवॉर्ड तयार करण्याचे काम करीत असताना सिडकोने भूखंड वितरणाची सर्व तयारी केली आहे. त्यामुळे यापूर्वी सिडकोत काय झाले हे आपणास माहीत नाही; पण आम्ही दिलेला विमानतळ प्रकल्पग्रस्तांना दिलेला शब्द पाळणार आहोत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी निश्चिंत राहावे, असे भाटिया यांनी स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2014 रोजी प्रकाशित
विमानतळ प्रकल्पग्रस्तांना अॅवॉर्ड मिळताच भूखंड वाटप
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादन प्रक्रिया रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू
First published on: 28-10-2014 at 06:58 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International airport project