‘जमात ए इस्लामी हिंद’च्या विदर्भस्तरीय परिषदेत उपस्थित इंजिनिअर मुहम्मद सलीम, तौफिक अस्लमखान, अब्दुर्रउफ  व  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर.
आगामी लोकसभा निवडणुका पाहता ‘जमात ए इस्लामी हिंद’ने ‘देश का विकास न्याय और सद्भावना के साथ’ विषयावर राज्यव्यापी मोहीम हाती घेतली असून त्यासाठी विदर्भस्तरीय परिषद जाफरनगरातील मर्कजे इस्लामी सभागृहात पार पडली.
संघटनेचे राष्ट्रीय सचिव इंजिनिअर मुहम्मद सलीम परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. या मोहिमे बरोबरच सर्वच राजकीय पक्षांसोबत आपला संवाद सुरू राहील. देशाचा विकास व विनाशाबाबत भारतवासींयांमध्ये जागृती यायला हवी. आपली लोकशाही अत्यंत दयनीय स्थितीतून जात आहे. देश भारत व इंडियामध्ये विभाजित झाल्याने गरिबांच्या गरजांवर परिणाम झाला आहे. श्रीमंताच्या इमारती, त्याचे राहणीमान गरिबांची चेष्टा करीत आहे. देशात घुसखोरी, सांप्रदायिकता व अनैतिकता वाढत आहे. अशा परिस्थितीत आमचे शांत राहणे अपराध ठरेल. न्याय, सन्मान व अधिकारांच्या संरक्षणाबरोबरच आधारभूत राजकारण व्हायला हवे. जातीय दंगली थांबविणारे विधेयक संमत न होणे आश्चर्यजनक आहे. बलात्काऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कठोर शिक्षा करावयास हवी, व्याजमुक्त अर्थनीती तयार करायला हवी, असे सलीम म्हणाले.
सरदार पटेल यांच्या अनुसार धर्मनिरपेक्षतेला परिभाषित करायला हवे. धर्मनिरपेक्षता देशाचा मूळ पाया आहे. देशाला सरंजामशाहीपासून वाचवून वास्तविक लोकशाहीची स्थापना व्हायला हवी, असे भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.  ‘जमात ए इस्लामी हिंद’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तौफिक अस्लमखान म्हणाले, या संघटनेने भारतवासीयांमध्ये जाऊन जनघोषणापत्र तयार केले असून ते देशवासीयांची गरज झाली आहे. भारत विकासाबाबत अग्रेसर असला तरी उच्चशिक्षणात एकच वर्ग पुढे आहे. मध्यम व निम्न वर्ग उच्चशिक्षणाच्या प्राप्तीपासून दूर आहे. पैगंबर हजरत मुहम्मद यांनी अरबमध्ये स्थापन केलेली शांतीयुक्त व्यवस्था सर्वप्रकारच्या अपराधांपासून मुक्त होती.
वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष अब्दुर्रउफ म्हणाले, हा पक्ष सर्वाचेच कल्याण इच्छितो.  ८० टक्के लोक उपाशी राहून कचऱ्यांमध्ये जीवनाचा शोध घेत आहेत. संपन्न लोक राज्य करीत आहेत. अनैतिकता वाढल्याने अविवाहित दशेतच मुले जन्माला येत आहेत. लोकांचे शोषण होत आहे. आम आदमी पार्टीच्या संयोजक अंजली दमानिया म्हणाल्या, भ्रष्टाचार दूर करण्यासाठी या पक्षाची स्थापना झाली असून भ्रष्टाचार समाप्त झाल्यासच देशाचा विकास होऊ शकतो. सिंचन घोटाळे झाले, परिणामी विस्थापितांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
हाफिज अकरम फलाही यांनी प्रारंभी कुराणातील काही ओळी सादर केल्या. ‘जमात ए इस्लामी हिंद’चे नागपूर शहर अध्यक्ष अजिजुर्रहमान खान यांनी प्रास्ताविकात परिषद आयोजित करण्यामागील उद्देश विशद केला. जनघोषणापत्रास उपस्थितांकडून समर्थन प्राप्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अन्वर सिद्दिकी यांनी केले. नियाजअली यांनी अखेरीस आभार मानले.