देशातील पहिले अत्याधुनिक बंदर म्हणून गणल्या जाणाऱ्या जेएनपीटी बंदराने सन २०१३-१४ या आर्थिक वर्षांत एकूण ६२ लाख टन माल हाताळणीचा टप्पा गाठला असून बंदराच्या रौप्यमहोत्सवी वर्षांतील सर्वाधिक उच्चांक आहे. या निमित्ताने बंदर तसेच बंदरावर आधारित उद्योगातील अधिकाऱ्यांनी आनंद साजरा केला.
जेएनपीटी बंदरातील जेएनपीटीसह तीन बंदरांनी या आर्थिक वर्षांत ६२ लाख टन मालाची हाताळणी केली. यापैकी ५५.२४ टक्के कंटेनर तर ६.२९ टक्के लिक्वीड मालाची हाताळणी केली. इतर मालाची ०.८२ इतकी केली. या आर्थिक वर्षांत जेएनपीटी बंदरातून एकूण ४१ लाख कंटेनरची हाताळणी करण्यात आली. ही कंटेनर हाताळणी देशातील कंटेनर हाताळणीच्या ५७ टक्के इतकी आहे. यामध्ये जेएनपीटी बंदरातून १३ लाख म्हणजे ३१ टक्के, दुबई पोर्ट(एनएसआयसीटी) बंदरातून ९ लाख ७० हजार म्हणजे २५ टक्के तर जीटीआय (एपीएम) बंदरातून सर्वाधिक १८ लाख म्हणजे ४५ टक्के कंटेनरची हाताळणी करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात जेएनपीटी बंदरातून ४८ लाख कंटेनरची हाताळणी केली जाईल, असा विश्वास जेएनपीटीचे अध्यक्ष एन. एन. कुमार यांनी या वेळी व्यक्त केले आहे. या वेळी मुख्य सतर्कता अधिकारी सुसवान बॅनर्जी, भारत पेट्रोलियमचे अनिल शुक्ल, एपीएमचे मुख्याधिकारी पी. के. अग्रवाल आदीजण उपस्थित होते. जेएनपीटीच्या नफ्यात ११ टक्क्यांनी वाढ जेएनपीटी बंदराच्या नफ्यात २०१२-१३ या आर्थिक वर्षांच्या तुलनेत २०१३-१४ या आर्थिक वर्षांत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षांत एक हजार ९८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षांत एक हजार २२९ कोटी रुपयांचा नफा जेएनपीटीला झाला आहे.