राज्यात ५० हजारपेक्षा अधिक संख्या असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात पाच सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्य शासनाच्या शिक्षक दिन कार्यक्रमस्थळी मोर्चा नेण्यात येऊन निदर्शने करण्यात येणार आहेत. याशिवाय या दिवशी नाशिकसह प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. संजय शिंदे व नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे यांनी दिली आहे.
लोकशाही व सनदशीर मार्गानी गेल्या तीन वर्षांत वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी फेब्रुवारी-मार्च २०१३ च्या इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. अधिवेशन काळात आंदोलन सुरू राहिल्याने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांनी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बोलणी करून राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी शासन आदेशानुसार काही किरकोळ मागण्यांचा अपवाद वगळता अर्थ विभागाशी निगडित असलेल्या मागण्यांवर दोन व तीन महिन्याच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्याच दिवशी १३ मार्च २०१३ रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात या आशयाची घोषणा करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
शासनाने दिलेली तीन महिन्याची मुदत उलटून गेली. परंतु कोणतीही कार्यवाही न झाल्याने २० जुलै रोजी विधान परिषदेत शिक्षक आमदारांनी विचारलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी पुढील १० ते १२ दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांच्यात पत्रव्यवहार होऊनही निर्णय न घेतला गेल्यामुळे राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन  शिक्षकांमध्ये शासनाविषयी असंतोष पसरला आहे. शासनाकडून निर्णय होत नसल्यामुळे नव्याने आंदोलन सुरू करण्याची घोषणा २२ ऑगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या राज्य महासंघाच्या बैठकीत करण्यात आली.
नाशिक जिल्ह्य़ातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी बहुसंख्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पाच सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारासमोर दुपारी एक वाजता जमावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. अहिरे, राज्य कार्याध्यक्ष प्रा. संजय शिंदे, उपाध्यक्ष प्रा. रमेश शिंदे आदिंनी केले आहे.