रायगड जिल्हय़ाला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जात असून पेण, अलिबाग व उरण तसेच काही प्रमाणात रोहा, मुरूड या तालुक्यातूनही मोठय़ा संख्येने हा मैदानी खेळ खेळला जातो. या मातीतल्या खेळानेच रायगड जिल्ह्य़ातील अनेक खेळाडूंना राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर अनेक मानसन्मान मिळवून दिलेले आहेत. डिसेंबरचा महिना उजाडल्याने कबड्डीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली असून गावोगावी नव्याने कबड्डीची मैदाने तयार करण्याची तसेच सरावाची लगबग सुरू झाली आहे. याच महिन्यात जिल्हास्तरीय चाचणी होऊन त्यातून जिल्ह्य़ाचा संघ निवडला जातो.
पेण तालुक्यातील एकही गाव असे नाही ज्या गावात कबड्डीचा संघ नाही. तीच गोष्ट अलिबाग तालुक्यातही आहे. त्याखालोखाल उरण तालुक्याचा क्रमांक लागतो. गावातील, तालुक्यातील कबड्डी स्पर्धामधून खेळता खेळता आपली चमक दाखवीत पेणमधील अनेक कबड्डीपटूंनी याच खेळाच्या माध्यमातून खेळातील सर्वोच्च समजला जाणारा छत्रपती पुरस्कार मिळविला आहे. यामध्ये विजय म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, संजय म्हात्रे व आशीष म्हात्रे या पेण तालुक्यातील कबड्डीपटूंना हा मान मिळाला आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले आहे.
मुलींच्या संघातही निवड झालेल्या तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले खेळाडू मूळचे रायगड जिल्ह्य़ातीलच आहेत. तसेच जिल्ह्य़ातील अनेक खेळाडूंना खेळाच्या जिवावरच अनेक ठिकाणी रोजगारही उपलब्ध झाले आहेत.
जिल्ह्य़ातील अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतात. मात्र त्यांना प्रशिक्षण, साधने याची कमतरता भासते त्याचप्रमाणे, खेळाडूंमध्ये वाढते बाजारीकरण केवळ बक्षिसासाठी आपला खेळ दाखविणे याचाही परिणाम आता या खेळावर जाणवू लागला आहे.
त्यामुळेच या कबड्डीच्या पंढरीतून नुकत्याच झालेल्या कबड्डीच्या लीगमध्ये एकही खेळाडू निवडला गेला नसल्याची खंत जिल्ह्य़ातील ज्येष्ठ खेळाडूकडून व्यक्त केले जात आहे.
सध्या सुरू असलेला सराव हा जिल्ह्य़ाच्या खालापूर येथे होणाऱ्या जिल्हा निवड चाचणीसाठी असून त्यासाठी खेळाडूचा सराव सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2014 रोजी प्रकाशित
कबड्डीच्या पंढरीत सरावाला सुरुवात
रायगड जिल्हय़ाला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जात असून पेण, अलिबाग व उरण तसेच काही प्रमाणात रोहा, मुरूड या तालुक्यातूनही मोठय़ा संख्येने हा मैदानी खेळ खेळला जातो.
First published on: 06-12-2014 at 04:48 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi practices began in uran