मनसेच्या कल्याण, डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी काटई, कोन, पडघा, मल्होत्रा टोल नाका येथे निदर्शने केली. या निदर्शनांमुळे या रस्त्यांवर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी बळाचा वापर करीत कार्यकर्त्यांना अटक केली. अटकेमुळे मानपाडा, भिवंडी, भादवड पोलीस ठाण्यांमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. कार्यकर्ते आक्रमक असल्याने तोडफोडीच्या भीतीने व्यापाऱ्यांनी तातडीने दुकाने बंद केली.
निदर्शने सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाल्याचे वृत्त कळताच कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले.
रस्त्यावरील कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात कल्याण, डोंबिवली शहरातून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांची हवा काढणे, ती रोखून धरणे असे कार्यक्रम सुरू केले. अतिशय शांतपणे सुरू असलेले आंदोलन हिंसक झाल्याने पोलिसांची काही वेळ तारांबळ उडाली. काही कार्यकर्त्यांनी कल्याण, डोंबिवली, भिवंडी शहरात जाऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. भीतीने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.