राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याणमधील  आगाराची दुरवस्था झाली आहे. आगारात सर्वत्र प्रसाधनगृहातून बाहेर पडणाऱ्या दरुगधीचा दरवळ, छतावरून पावसाच्या धारा, आगाराच्या आवारात कचरा, खड्डे, विश्रामगृहात पावसाचे कारंजे असे विदारक दृश्य कल्याण एस. टी. आगारात दिसत आहे.
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ मोक्याच्या ठिकाणी हे आगार आहे. स्थानिक, लांब पल्ल्याच्या शेकडो बसची या ठिकाणाहून दररोज ये-जा सुरू असते. लाखो रुपयांचा महसूल प्रवाशांकडून राज्य परिवहन मंडळाला कल्याण एस. टी. आगारातून मिळतो. असे असूनही प्रवाशांच्या सोयीसाठी आगारात का सुविधा दिल्या जात नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 आमदार प्रकाश भोईर यांनी आगार व्यवस्थापक, विभागीय नियंत्रक यांची भेट घेऊन आगारात तातडीने प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आगारातील घाणीचे साम्राज्य, दरुगधी, खड्डे, डबकी या सगळ्या व्यवस्थेत आपण कसे काय बसता असा प्रश्न आमदार भोईर यांनी चालक, वाहकांना केला. त्या वेळी त्यांनी वरिष्ठांकडून देण्यात येणाऱ्या दुजाभावाच्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली. आमदारांच्या भेटीनंतर एस. टी.चे स्थापत्य विभागाचे अधिकारी कल्याण एस. टी. आगाराची पाहणी करून गेले. अत्यावश्यक सुविधा लवकर करण्याचे आश्वासन स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.