स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे कन्याकुमारी ते नागपूर अशी २ हजार कि.मी.ची स्केटिंग यात्रा आयोजित करण्यात आली असून त्यात नागपूरातील विविध स्केटिंग क्लबचे २३ युवक सहभागी होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष आणि या यात्रेचे संयोजक दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कन्याकुमारी ते नागपूर यात्रा २ जानेवारीला सकाळी ८ वाजता स्वामी विवेकानंद स्मारकाजवळून निघणार आहे. कन्याकुमारीच्या नगराध्यक्ष जे प्रभा विन्स्टन आणि नागपूरचे महापौर अनिल सोले हिरवी झेंडी दाखवून यात्रेला प्रारंभ करतील. यावेळी महापालिकेचे पदाधिकारी आणि काही नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. व्यसनमुक्त देश या विषयावर जनजागृती करीत ही यात्रा जागोजागी सभा आणि मेळावे आयोजित करणार आहे. ११ दिवसात ही यात्रा पूर्ण करण्यात येणार असून १२ डिसेंबरला सायंकाळपर्यंत नागपुरात पोहचणार आहेत. नागपूर ते कन्याकुमारी या मार्गावर स्केटिंग करणाऱ्या २५ युवकांची राहण्याची, आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेतर्फे वेगवेगळ्या शहरात व्यवस्था करण्यात आली आहे.
तामिळनाडू, कर्नाटक, आंद्रप्रदेश आणि महाराष्ट्र अशा चार राज्यातून ही यात्रा प्रवास करणार आहे. २३ युवक स्केटिंगने हा प्रवास करणार असून त्यांच्यासमोर पायलट व्हॅन राहणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून या यात्रेसाठी २३ मुले सराव करीत आहेत. गजेंद्र बन्सोड या कोच म्हणून काम पहात आहेत. २३ जणांच्या स्केटिंगच्या चमूमध्ये दोन मुलींचा समावेश आहेत. नागपुरातील २ युवक हैदाराबादमधून या यात्रेत सहभागी सहभागी होतील. चारही राज्यातील मुख्यमंत्री, प्रत्येक जिल्ह्य़ातील जिल्हाधिकारी आणि काही सामाजिक संघटनांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या असून त्यांच्याशी पत्रव्यव्यहार करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांना या संदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही अडचणी येऊ नये यासाठी त्या त्या राज्यातील पोलीस महासंचालकांशी संपर्क करण्यात आला आहे. या शिवाय रामकृष्ण मठाची ज्या ठिकाणी कार्यालये आहेत तिथेही व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेसोबत मेडिकल व्हॅन राहणार असून चार डॉक्टरांची चमूदेखील जाणार आहे. पायलट म्हणून काही विद्यार्थ्यांचे पालक या यात्रेत सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवशी कन्याकुमारी ते मदुराई असा २४७ किमी प्रवास करणार आहे. प्रत्येक युवकांमागे किमान ४० हजार रुपये खर्च आहे. या यात्रेसाठी १९ ते २० लाख रुपये खर्चाची महापालिकेतर्फे तरतुद करण्यात आली आहे. स्केटिंग यात्रेत सहभागी होणारे १० ते ३२ या वयोगटातील असल्याचे तिवारी यांनी सांगितले.