साखर, गूळ, शेंगदाणे, साबुदाणा, भगर, लोणी, तूप यासह फराळासाठी लागणाऱ्या पदार्थाचे आणि फळांचे किरकोळ बाजारातील भाव आकाशाला भिडलेले असल्याने कार्तिक शुद्ध एकादशीचा उपवासही चांगलाच महागात पडणार आहे.
कार्तिकी आणि आषाढी या दोन मोठय़ा एकादशींचे राज्यात विशेष महत्त्व आहे. एक व्रत मानून भाविक एकादशीला उपवास करतात. पंढरपूरचे विट्ठल-रुक्मिणी हे राज्याचे लोकदैवत असल्याने या दोन्ही एकादशीला पंढरीत भक्तजन गोळा होतात. आषाढी-कार्तिकी भक्तजन येती, पंढरीचा महिमा वर्णवा किती, असा पंढरीचा महिमा संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीतून वर्णन करून दोन्ही एकादशींचे महत्त्व सांगितले आहे. कंठी मिळवा तुळसीदळ, वृत्त करा एकादशी, असा उपदेशच संतांनी भक्तांना केला आहे. आषाढी एकादशीपासून (३० जून) सुरू झालेल्या चातुर्मासाची सांगता कार्तिकी एकादशीला उद्या शनिवारी, २४ नोव्हेंबरला होणार आहे. यावर्षी अधिक मासामुळे चातुर्मासही लांबला होता. कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशीही म्हणतात. या एकादशीपासून तुलसी विवाह आरंभ होत असल्याने विशेष महत्त्व आहे. एकादशीच्या व्रतालाही महागाईची झळ बसली आहे. या निमित्ताने वारक ऱ्यांसह अनेक भक्तजन उपवास करीत असले तरी उपवासाचा फराळ मात्र चांगलाच महागला आहे.
किरकोळ बाजारात जीवनावश्यक वस्तू व फळांचे भाव वाढले आहेत. साखरचे भाव ४० ते ४६ रुपये किलो, गूळ ५० रुपये, शेंगदाणे ७० ते ८० रुपये, साबुदाणा ७२ रुपये, भगर ८० रुपये, शिंगाडा २०० रुपये, शेंगदाणा तेल १५५ रुपये, तूप ५०० रुपये, लोणी ३६० रुपये, डालडा १०० रुपये, खोबरे ८० ते १०० रुपये, खारीक ८० ते १०० रुपये, पेंडखजूर ८० रुपये याप्रमाणे आहेत.
उपवासाला फळांचा आहारही घेतला जातो, पण किरकोळ बाजारात फळांचे दरही आकाशाला भिडले आहेत.
केळी ४० रुपये डझन, सफरचंद १५० रुपये किलो, मोसंबी ५० ते ६० रुपये, डाळिंब १५० रुपये, आलुबुखारा १०० रुपये, रताळे ६० रुपये याप्रमाणे भाव असल्याने एकादशीला उपवास करणे सामान्यांना महागात पडणार आहे.
शेंगदाणा व साबुदाण्याची उसळ, खिचडी, रताळे, दाण्याची आमटी, भगर, राजगिरा, पेंडखजूर, फळांचा रस, लिंबू सरबत, बटाटा वडा, साबुदाणा वडा, बटाटे भाजी, थालीपीठ, मलाई दही, दूध, नारळ पाणी आणि विविध फळांचा आहार घेतला जातो.
एकदशीला उपवास असला तरी अधिक आहार घेतला जातो. आध्यात्माच्या दृष्टिकोनातून उपवास याचा अर्थ नामस्मरण करून भगवंताशी जवळीक साधणे असा केला जातो, पण सामान्यांना याचा विसर पडतो आणि उपवास ही केवळ एक औपचारिकता होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2012 रोजी प्रकाशित
कार्तिकी एकादशीचा उपवासही पडणार महागात दिलीप
साखर, गूळ, शेंगदाणे, साबुदाणा, भगर, लोणी, तूप यासह फराळासाठी लागणाऱ्या पदार्थाचे आणि फळांचे किरकोळ बाजारातील भाव आकाशाला भिडलेले असल्याने कार्तिक शुद्ध एकादशीचा उपवासही चांगलाच महागात पडणार आहे.

First published on: 24-11-2012 at 01:38 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartiki ekadashi fast will be also in prise hike