पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळील पी. पी. चेंबर्स मॉलमधील समावेश आरक्षणाखाली मिळालेले व्यापारी गाळे तीस वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याच्या पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. काही ‘ठरावीक’ व्यापाऱ्यांना हे गाळे देण्यासाठी प्रशासन हालचाल करीत असून त्यामध्ये पालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होणार असल्याची तक्रार काँग्रेस, सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकाने केली आहे. हीच तक्रार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्री कांत सिंग यांच्याकडेही करण्यात आली आहे.  
डोंबिवली पूर्व पालिका कार्यालयाजवळ पी. पी. चेंबर्स मॉलमध्ये पालिकेला समावेश आरक्षणाखाली चार व्यापारी गाळे मिळाले आहेत. या गाळ्यांमधून पालिकेला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळू शकतो. पालिकेच्या मालमत्ता काही लोकप्रतिनिधी, मध्यस्थ यांच्या संगनमताने मर्जीतल्या व्यापाऱ्यांच्या घशात घालून पालिकेचे नुकसान करण्याची परंपरा वर्षांनुवर्षे पालिकेत सुरू आहे. या माध्यमातून गाळ्याचा मालक व त्याचे निम्मे भाडे गाळे मिळून देणाऱ्या नगरसेवकाला वर्षांनुवर्षे मिळत राहते, अशी पालिकेत पद्धत आहे. अधिकारी यामध्ये अगोदरच एकरकमी हात मारून मोकळा होतो.
पालिकेच्या कल्याण-डोंबिवलीतील भाजी मंडया त्याचे ताजे उदाहरण आहे. असे सेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मनसेचे नगरसेवक प्राजक्त पोतदार यांनीही या मालमत्तांमध्ये पालिकेची कार्यालये सुरू करावीत अशी मागणी महासभेत केली आहे.
पालिकेची डोंबिवली कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे या इमारतीमधील कार्यालये पी. पी. चेंबर्समधील गाळ्यांमध्ये स्थलांतर करावीत किंवा नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी पालिकेची देयक भरणा केंद्रे सुरू करावीत. तसेच, दूरध्वनी, महावितरणची देयक स्वीकृत केंद्रे सुरू करण्यासाठी जागा भाडय़ाने द्यावी, अशी मागणी वामन म्हात्रे यांनी केली आहे. गेल्या महिनाभर पालिकेच्या मालमत्तांचा धडाकेबाज लिलाव सुरू असल्याने महापौर कल्याणी पाटील, आयुक्त शंकर भिसे यांना पालिकेचा लिलाव करायचा आहे की काय, अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे.  
काँग्रेसचे नगरसेवक रवी पाटील यांनी मुख्यमंत्री, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्री कांत सिंग यांना पत्र देऊन पालिका प्रशासनाने पालिकेच्या मालमत्ता नागरी हित व पालिकेच्या आर्थिक नुकसानीचा विचार न करता विकण्याचा धडका लावला आहे. त्यामुळे आयुक्त शंकर भिसे यांना याबाबत जाब विचारण्यात यावा अशी तक्रार केली आहे.