कल्याण-डोंबिवली महापालिकेतील लाचखोर प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे तसेच उपअभियंता दत्तात्रय मस्तूद यांचे निलंबन कायम करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणला आहे. लाचखोरी करताना पकडल्या गेलेल्या अधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिका बदनाम होऊ लागली असताना बोराडे आणि मस्तूद यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याच्या प्रस्तावावर नगरसेवक कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. बोराडे, मस्तूद यांच्यासह लाचखोर नगरसेवक विद्याधर भोईर यांच्याविषयीचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला आहे. भोईर हे सत्ताधारी पक्षाचे समर्थक अपक्ष नगरसेवक आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी विविध प्रकारच्या खेळी करत लाचखोर अधिकाऱ्यांना महापालिका सेवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे लपून राहिलेले नाही. गणेश बोराडे यांच्याविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी असताना काही नगरसेवकांचा त्यांना राजाश्रय असल्याची चर्चा होती.