पत्रकारांच्या गृहनिर्माणचा प्रश्न सोडवू- क्षीरसागर
पत्रकारांनी लेखणीद्वारे चुकीच्या गोष्टींवर प्रहार करावेत, पण एखाद्याला मोठी जखम होणार नाही, याचीही खबरदारी ठेवावी. समाजातील चांगल्या गोष्टींना पुढे आणावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेला जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
बीड जिल्हा पत्रकार संघ व मराठी परिषदेच्या वतीने रविवारी ‘दर्पणदिनी’ पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, पत्रकार संघाचे संतोष मानूरकर, वसंत मुंडे, महेश वाघमारे, लक्ष्मीकांत वाहेगव्हाणकर, शेखर कुमार आदी उपस्थित होते.
यावेळी क्षीरसागर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात आणि आता प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांमुळे या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे; पण वृत्तपत्रावरील समाजाचा विश्वास आजही कायम आहे. स्पर्धेत व्यवहारवादी राहून वृत्तपत्र चालवावे. मात्र, त्यात नकारात्मक दृष्टिकोन आणू नये, पत्रकारांनी लेखणीद्वारे चुकीच्या गोष्टीवर लिहिले पाहिजे, परंतु एखाद्याला मोठी जखम होणार नाही याचीही काळजी घ्यावी, ‘वैर विसरून वार करावा व तोल लावून बोल धरावा’ याचे आचरण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजातील चांगल्या गोष्टी पुढे आल्या तर त्याचा चांगला परिणाम होईल. मध्यंतरीच्या काळात बीडमधील पत्रकारांनी ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या विषयात जिल्ह्य़ाची बदनामी झाली तरी चालेल पण ही प्रवृत्ती मुळापासून नष्ट झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा केला. याचे कौतुक करून विकासात पत्रकारांची सकारात्मक भूमिका राहिली आहे, याचा उल्लेखही त्यांनी केला.
बीड शहरातील पत्रकारांच्या संस्थेसाठी जागा मिळवून देण्यासाठीही आपण स्वत: पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही क्षीरसागर यांनी दिली. प्रास्ताविक वसंत मुंडे तर सूत्रसंचालन महेश वाघमारे यांनी केले.
दर्पण दिनानिमित्त ‘भारत स्काऊट गाईड’ संस्थेच्या सभागृहात गणेश शेवंतकर यांच्या व्यंगचित्राचे प्रदर्शन करण्यात आले असून त्याचे उद्घाटनही पालकमंत्री क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.