लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सिडकोच्या वतीने खारघर येथील व्हॅलीशिल्प घरांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यामुळे त्यांची सोडत काढण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती सिडको प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. ती निवडणूक आयोगाने मान्य केली असून या सोडतीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे सिडको या घरांची सोमवारी २४ मार्च रोजी सोडत काढणार आहे. यात तीन हजार ३१५ ग्राहकांपैकी एक हजार २२४ ग्राहक घरांसाठी भाग्यवंत ठरणार आहेत. काही संवर्गासाठी कमी अर्ज आल्यामुळे आलेल्या अर्जाना हुकमी घर मिळणार आहेत. यात आमदार, पत्रकार आणि प्रकल्पग्रस्तांचा समावेश आहे.
सिडकोने खारघर सेक्टर ३६ मध्ये अल्प, मध्यम, उच्च, आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहसंकुल बांधण्यास घेतले आहे. यातील साडेतीन हजार घरांचे काम अद्याप सुरुवातीच्या टप्यात आहे. या संकुलाच्या बाजूला मध्यम व उच्च उत्पन्न गटातील एक हजार २२४ घरांसाठी १६ जानेवारीपासून अर्ज मागविले होते. तेरा हजार ४३५ अर्ज विकले गेले होते. त्यापैकी तीन हजार ३१५ अर्ज भरून सिडकोकडे परत आलेले आहेत. यात उच्च ७३३ व मध्यम उत्पन्न गटासाठी दोन हजार ५८२ अर्जाचा समावेश होता. यात २६८ राखीव घरांना अर्ज प्राप्त झालेले नाहीत. पत्रकार, प्रकल्पग्रस्त, आमदार यांनी कमी अर्ज भरले तर सिडको कर्मचाऱ्यांनी एकही अर्ज न भरल्याने त्यांच्यासाठी असणारी ८० घरे तशीच शिल्लक राहणार आहेत. लोकवस्तीपासून दूर, वाहतुकीच्या साधनांचा अभाव, जास्त दर, अनामत रकमेची जादा मागणी, आर्थिक मंदी, रोख रकमेची अनामत रक्कम या सर्व कारणांमुळे या गृहनिर्माण प्रकल्पाला म्हणावा तसा प्रतिसाद आला नाही. या घरांची जाहिरात सिडकोने जानेवारीमध्ये प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अर्ज घेणे, छाननी करणे आणि सोडत काढणे हा सर्व कार्यालयीन कामकाजाचा प्रकार असल्याने या घरांची सोडत काढण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशी सिडकोला खात्री होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्याने सिडकोने या घरांची सोडत काढण्यासाठी परवानगी मागितली होती. ती आयोगाने दिलेली आहे. हा सिडकोच्या कामकाजाचा नियमित प्रकार असून यामुळे मतदारांना कोणताही राजकीय पक्ष प्रलोभन देत असल्याचे दिसून येत नाही. सिडकोने ही सोडत काढण्यास कोणतीही हरकत नसल्याचे आयोगाने कळविले आहे. त्यामुळे सोमवारी २४ मार्च रोजी या घरांची सोडत नेरुळ येथील आगरी कोळी भवनाच्या सभागृहात काढली जाणार आहे.