जागोजागी उखडलेल्या कोल्हार ते कोपरगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.
कोल्हार ते कोपरगाव हा सुमारे पन्नास किलोमीटरचा रस्ता वाढती वाहतूक आणि देखभालीअभावी जागोजागी उखडत आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे, वाहतुकीचीही कोंडी होते. या पाश्र्वभूमीवर विखे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान सचिव मुखर्जी यांच्याशी चर्चा केली.
या चर्चेचा तपशील देताना विखे म्हणाले, कोल्हार ते कोपरगाव या रस्त्याचे चौपदरीकरणासह शिर्डीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम महिनाभरात सुरु करण्याची ग्वाही मुखर्जी यांनी दिली. हा प्रकल्प बीओटी तत्वावर राबविला जात असून त्यासाठी संबंधित ठेकेदाराला लागणारा निधी बँकेकडून कर्जाद्वारे उभारण्यात आलेला होता. तथापि, ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्यामुळे काम पूर्ण होण्याबरोबरच बँकेच्या कर्जफेडीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीत सर्व बँकांनी नविन ठेकेदारालाही कर्ज देण्याचे मान्य केल्याने मोठा अडथळा दूर झाला असून, लवकरच कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.
या रस्त्याची डागडुगी बांधकाम खातेच करणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने मंजूर झाला असून त्याचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु आहे. त्यामुळे कोल्हार ते कोपरगाव मार्गावरुन उसाची वाहतूक करणाऱ्या बैलगाडय़ांमुळे वाहतुकीची कोंडी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. विशेषत: कोल्हार येथील प्रवरा नदीवरील जुना पूल नियमित रहदारी आणी ऊस वाहतूक पेलण्यास असमर्थ आहे. कोल्हार बुद्रुक आणि कोल्हार खुर्दला जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील नवीन पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या जुन्या पुलावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे गळीत हंगामाचा काळ लक्षात घेता ऊस वाहतूक करणाऱ्या
बैलगाडय़ा व अन्य वाहनांसाठी प्रवरा नदीवरील जुन्या पुलाशेजारी नदीपात्रात तात्पुरता रस्ता
तयार करण्याचे काम मुखर्जी यांच्या आदेशानुसार तातडीने सुरू करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.