जेथे शांतता सुव्यवस्था असते, त्या गावाची नेहमीच प्रगतीकडे झेप असते, मात्र कोपरगाव शहराची अवस्था मी जशी पाहिली होती तशी आजही कायम आहे, असे रोखठोक प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी केले. शहरात झालेल्या जातीय भांडणात पोलीस प्रशासन सर्वतोपरी सहकार्य देईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
मकरसंक्रांतीच्या दिवशी किरकोळ कारणावरून व पतंग उडवण्यावरून दोन गटांत दोन वेगवेगळय़ा गटांत तुफान हाणामाऱ्या झाल्या होत्या. त्यात २२ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून १४ जणांना अटक केली होती. त्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस ठाण्यात सलोखा बैठक घेण्यात आली त्या वेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सभेच्या प्रसंगी कोपरगावी काही वर्षांपूर्वी भेट देण्याचा प्रसंग आला होता. त्या वेळी मी पाहिलेले कोपरगाव शहर आजही त्याच अवस्थेत मला पाहायला मिळाले. ज्या शहरात शांतता कायदा सुव्यवस्था असते त्या गावाची नेहमीच भरभराट होते. प्रगतिपथावर विकास होत असतो. कोपरगाव शहरात मकरसंक्रांतीच्या दिवशी दोन वेगवेगळय़ा घटनांत झालेल्या हाणामाऱ्यांचा प्रकार निंदनीय असून, असे प्रकार होऊ नयेत यासाठी सर्वानी सतर्क असले पाहिजे.