कृष्णा सहकारी बँकेने चांगली प्रगती केली असून, गत आर्थिक वर्षांत २६० कोटींचा व्यवसाय साध्य करताना ३ कोटी १७ लाखांचा ढोबळ नफा कमावला असून, एनपीएचे प्रमाण दोन टक्केवर आहे. भविष्यात राज्यातील अग्रगण्य बँक म्हणून कृष्णा बँक  नावलौकिक प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचाच भाग म्हणून कोअर बँकिंग प्रणाली राबविणार असल्याचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.
कृष्णा सहकारी बँकेची ९७ व्या घटना दुरूस्तीसाठी विशेष सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. सुरेश भोसले, शिवाजीराव थोरात, बी. आर. पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अतुल भोसले म्हणाले की, बँकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या चार जिल्ह्यांमध्ये १६ शाखा व एक विस्तारित कक्ष असून, त्या माध्यमातून १६३ कोटी रुपयांच्या ठेवी जमा करताना, ९७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. व्यवसायामध्ये १८ टक्के वाढ झाली आहे. सहकारामुळे राज्यात खऱ्या अर्थाने क्रांती झाली. सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी घटनादुरूस्ती महत्त्वाची आहे. सभासदांचा विश्वास हीच सहकारी बँकेतील मोठी ठेव असते. आता या घटनादुरूस्तीमुळे सभासदांचा सहकारी संस्थेतील सहभाग वाढणार आहे. गेल्या आर्थिक वर्षांत बँकेच्या ठेवींमध्ये ४० कोटींनी वाढ झाली आहे. सभासदांच्या सहकार्यातून चालू वर्षांत ३०० कोटी रुपायांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करण्याचे व एनपीए शून्य टक्क्यावर आणण्याचा मानस आहे
डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी १९७१ साली स्थापन केलेल्या कृष्णा बँकेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मदत झाली. मी ही काही वष्रे बँकेचे अध्यक्षपद सांभाळले पण डॉ. अतुल भोसलेंच्या नेतृत्वाखाली बँकेने चांगला नफा मिळविला आहे. त्यामुळे यावर्षी सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे यांनी अहवालवाचन केले.