सहार उन्नत मार्गासाठीचा भुयारी मार्ग वाहनधारकांसाठी गफलतीचा
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून अवघ्या पाच मिनिटांत थेट मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी सहार उन्नत मार्ग प्रकल्प खुला झाला खरा; पण दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी करण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या आरंभी कसलाच सूचना फलक वा दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे अनेक वाहनधारक गफलतीने भुयारी मार्गाकडे जात असून आपण भलत्याच रस्त्यावर लागल्याचे लक्षात आल्यावर ते परत फिरण्यासाठी वळतात. या गडबडीत भुयारी मार्गाच्या तोंडावरच वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यातून मोठा अपघात होण्याची भीती आहे. सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या ‘टर्मिनल २’ या नवीन टर्मिनलच्या बरोबरीने उन्नत मार्ग प्रकल्प सुरू झाला. दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेली मार्गिका वाहनांना उन्नत मार्गाकडे जाणाऱ्या भुयारी रस्त्याकडे जाते. पण त्या मार्गिकेच्या आरंभी कसलाही सूचना फलक नाही. केवळ मार्गिका सुरू होते त्या ठिकाणी प्लास्टिकचे दुभाजक लावण्यात आलेले आहेत. परिणामी रस्त्याच्या उजव्या बाजूने येत असलेल्या वाहनधारकांची गफलत होते. ते चुकून थेट भुयारी मार्गाकडे जातात. समोर भुयारी मार्ग दिसताच त्यांना गफलत झाल्याचे लक्षात येते व ते परत द्रुतगती महामार्गावर येण्यासाठी मागे वळतात व त्यात तारांबळ उडते. ही परत जाणारी वाहने आणि विमानतळाकडे जाण्यासाठी आलेली सुसाट वाहने यांची एकमेकांना चुकवताना कसोटी लागते. वाहतूक अडते आणि अपघाताचीही भीती आहे. त्यामुळे भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या आरंभीच तसा ठळक फलक लावण्याची गरज आहे.पश्चिम द्रुतगती महामार्ग ते विमानतळापर्यंत १.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग, विलेपार्ले येथील हनुमान रोड येथे पादचारी आणि वाहनांसाठी भुयारी मार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर भुयारी मार्ग असा २.२० किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. आधी पश्चिम द्रुतगती मार्गावरून आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी साडे चार किलोमीटर लांबीचे अंतर कापण्यासाठी ४० मिनिटे लागायची. आता या प्रकल्पामुळे कोणत्याही सिग्नलशिवाय अवघ्या पाच मिनिटांत द्रुतगर्ती मार्गावरून थेट विमानतळापर्यंत पोहोचता येईल. दोन्ही बाजूला पामची झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले आहे.
असा आहे प्रकल्प..
’ प्रत्येक बाजूला तीन मार्गिका असा २७.५० मीटर रूंदीचा
सहा पदरी उन्नत मार्ग.
’ बोरिवली, कांदिवली, जोगेश्वरी आदी उत्तर मुंबईकडून
येणाऱ्या वाहनांना उन्नत मार्गावर जाण्यासाठी रस्ता.
’ तर दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी पश्चिम द्रुतगती
महामार्गावरून भुयारी मार्ग व त्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजूला मार्गिका.