पाणीटंचाईची संभाव्य अडचण लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने १७ डिसेंबपर्यंत टंचाईचे परिपूर्ण आराखडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी टंचाई बैठकीत दिला.
जिल्हय़ात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणासोबतच तलाव, विहिरीत पाण्याचा साठा वाढला नाही. परिणामी, जिल्हय़ावर पिण्याच्या पाण्याचे संकट येणार हेच चित्र समोर ठेवून आमदार भाऊ पाटील व राजीव सातव यांनी दोन दिवसांपूर्वी तालुकास्तरावर टंचाईच्या बैठका घेतल्या. जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनेची अपूर्ण कामे हाच विषय सर्वत्र गाजत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी पोयाम यांनी पाणीपुरवठा यंत्रणेची बैठक घेतली. आमदारांनी घेतलेल्या बैठकीतील पाणीप्रश्नावरील मुद्दे विचारात घेऊनच १७ डिसेंबपर्यंत पाणीटंचाईचे परिपूर्ण आराखडे तयार करून सादर करण्याचा आदेश पोयाम यांनी दिला. भूजल सर्वेक्षण विभागास तात्काळ सव्‍‌र्हेच्या कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. टंचाई आराखडे तयार करताना त्यात कुठल्याच प्रकारच्या त्रुटी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. नळयोजनेची कामे पूर्ण करणे, दुरुस्ती आवश्यक, संभाव्य टँकर, विंधन विहिरी अधिग्रहण या बाबी विचारात घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.