महिला गुन्हेगारीत असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. संघटित टोळी किंवा सूत्रधार असण्याचे प्रमाण तसे कमीच आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत मात्र अशा महिला सूत्रधाराचे नाव समोर आले आहे. या महिलेच्या नावावर तब्बल ३५ गुन्ह्य़ांची नोंद असून तेल माफिया म्हणून तिचा दबदबा आहे. मुंबई पोलिसांनी शिवडी येथील तेल तस्करीचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर पडद्यामागील महिला सूत्रधाराची कहाणी समोर आली आहे.
शिवडी येथील तेल डेपोतून तेलाची तस्करी होत असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी सापळा लावून तेथे छापा घातला. जहाजामधील पेट्रोल- डिझेल चोरून टँकरद्वारे बाहेर नेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तीन टँकरसहित २५ लाख रुपये किमतीचे पेट्रोल आणि डिझेल जप्त केले. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी धनराज सावरी, मोहम्मद शेख, विनयकुमार सिंह, हजरत शेख या चौकडीला अटक केली. हे सर्वजण टँकरचालक असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या टोळीची मुख्य सूत्रधार एक महिला असल्याचे ऐकून पोलिसांना धक्का बसला. पूर्वी पतीसोबत छोटय़ा-मोठय़ा गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या या महिलेचे नाव आहे बानू गुल मोहम्मद उर्फ लल्लाईन भाभी (६०). तिला तिचे म्होरके ‘लेडी डॉन’ म्हणतात. पोलिसांच्या नोंदीतही तिला तसेच संबोधले जाते. ती शिवडी परिसरात राहते. पूर्वी ती टोळीमध्ये काम करायची. मात्र टोळ्यांतील गुंड तुरूंगात गेल्यावर आणि काहीजण पोलीस चकमकीत ठार मारले गेल्यानंतर तिने तेल तस्करीकडे मोर्चा वळविला. गेल्या काही वर्षांपासून ती तेल तस्करीच्या बेकायदेशीर धंद्यात सक्रीय असून तिने आपले वर्चस्व निर्माण केल्याची माहिती कृष्णप्रकाश यांनी दिली. लल्लाईन भाभी सध्या आपल्या साथीदारांसह फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
बंदरात येणारे जहाजांमधील डिझेल चोरी करण्यात ही टोळी सक्रीय होती. विशिष्ट यंत्राद्वारे जहाजाच्या टाकीचे ‘सील’ तोडून त्यातील पेट्रोल आणि डिझेल काढून टॅंकरमध्ये भरले जायचे आणि बाहेर काळ्या बाजारात विक्री केली जायची. स्थानिक पोलिस लल्लाईन भाभीच्या ‘पे-रोल’वर असल्यानेच तिच्यावर कारवाई होत नव्हती. तिची मुलेही याच टोळीत कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेलाची ही तस्करी राजरोसपणे सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Aug 2013 रोजी प्रकाशित
‘लेडी डॉन’ आता तेल माफिया
महिला गुन्हेगारीत असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. संघटित टोळी किंवा सूत्रधार असण्याचे प्रमाण तसे कमीच आहे.
First published on: 14-08-2013 at 10:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lady don becomes oil mafia