शाळाबाह्य़ व स्थलांतरित मुलींच्या पालकांशी संवाद साधून या मुली रोज शाळेत येतील, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने ‘लेक शिकवा अभियाना’ चा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा व राज्यमंत्री फौजिया खान यांच्या उपस्थितीत हा प्रारंभ झाला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुलींनी मल्लखांब, तलवारबाजी व कराटेची रोमहर्षक प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांमुळे प्रत्येकाच्या मनी ‘लेकीला शिकवूच’ असेच भाव आले.
‘लेक शिकवा अभियान’ चा कार्यक्रम सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर घेण्यात आला. आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुभाष झांबड व कल्याण काळे, शिक्षक संचालक सर्जेराव जाधव, महावीर माने, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदींची उपस्थिती होती. मंत्री दर्डा यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी जागरूक राहायला हवे, असे सांगितले. शिक्षण विभागाने विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा व शाळाबाह्य़ मुली असू नयेत, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मुलींना स्वसंरक्षणार्थ ज्युदो कराटेचे प्रशिक्षण, मुलगी किमान पदवीधर व्हावी इथपर्यंत प्रत्येकाने मुलीला शिकवावे, असे वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा भाग आहे. २६ जानेवारीपर्यंत अभियान सुरू राहणार आहे.
राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थिनींनी विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली. ‘मी शिक्षण अर्धवट सोडणार नाही’ अशी शपथ शहरातील १०० शाळांतील मुलींनी घेतली.