बॅंक खातेदारांच्या एटीएम कार्डाची माहिती व पासवर्ड हॅक करून बनावट कार्डाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातील रकमांवर हातसफाई करण्याच्या घटना वाढत आहेत. मुंबई आणि पुण्यातील खातेदारांना चोरटय़ांनी आता लक्ष्य केले असून, नवी मुंबई परिसरातील एटीएम मशीनमधून पैसे किंवा दुकानातून खरेदी करून त्यांच्या खात्यातील लाखो रुपये लंपास केले आहेत.  मालाड येथे राहणाऱ्या स्नेहा अरविंदभाई मिस्त्री यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या खात्यातून एटीएमद्वारे ४७ हजार रुपयांची रोकड काढल्याचा संदेश मोबाइलवर आला. मात्र त्यांनी पैसे काढले नसताना त्यांना हा संदेश कसा आला. याबाबत त्यांनी बॅंकेला विचारणा केली असता, खारघर येथील भूमी टॉवरमध्ये असलेल्या स्टेट बॅंक ऑफ पटियाला या बॅंकेच्या एटीएममधून ही रक्कम काढण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. याप्रकरणी त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याच प्रमाणे पुण्यातील गोविंद कबे यांच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चोरटय़ांनी तब्बल १ लाख ३५ हजारांची खरेदी केली आहे. सीवूड येथील शगून शॉपमध्ये कुर्ला येथील नीलेश पिपलीया याने त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यांचा वापर करताना ग्राहकांनी खबरदारी घ्यावी. त्याची माहिती किंवा पासवर्ड कोणासमोरही उघड करू नये. काही दिवसांनी पासवर्ड बदलावा. ऑनलाइन खदेरी करताना योग्यती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.