सार्वजनिक रस्त्यांवर वाढदिवस, उत्सव व इतर कोणत्याही कारणांवरून डिजिटल फलक (फ्लेक्स) लावण्यास महापालिका प्रशासनाने बंदी घातली असताना त्याप्रमाणे बंदीचा आदेश अमलात येत नाही. उलट, अशा डिजिटल फलकांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याचा प्रकार घडतो. यंदा शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर शहरात अनेक रस्त्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांसह विविध राजकीय पुढाऱ्यांचे डिजिटल फलक झळकत आहेत. या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी आता पोलीस प्रशासनानेच खंबीर भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शिवजयंतीच्या तोंडावर शहरातील लष्कर भागात एका महापुरूषाचे छायाचित्र असलेले डिजिटल फलक फाडण्याचा प्रकार घडला. नंतर काही व्यापाऱ्यांच्या दुकानांवर दगडफेकीचे प्रकारही घडले. त्यामुळे डिजिटल फलक सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू शकतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसानी पाच जणांना अटक केली आहे.
एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखले जाणारे व नंतर वस्त्रोद्योग बंद पडल्यानंतर विकासापासून दुरावले गेलेले सोलापूर हे आता सार्वजनिक उत्सवांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या शहरात वर्षभरात विविध प्रकारचे सुमारे २३ उत्सव साजरे होतात. त्यात वरचे वर आणखी भरच पडत चालली आहे. त्यामुळे आपसूकच डिजिटल फलकांची चलती होताना पाहावयास मिळते. राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस, महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेचा वर्धापनदिन अशा एक ना अनेक कारणांनी शहरात अनेक रस्त्यांवर डिजिटल फलकांचे पेव फुटले आहे. यात राष्ट्रीय स्तरावरच्या कर्तृत्ववान नेत्यांच्या छबीसमोर मटका, जुगारअड्डम्े चालविणारे गुंड, वाळू तस्कर तसेच कुंटणखाने चालवून त्यावर कमाई करीत राजकारणात शिरकाव करणाऱ्या मंडळींच्या छबीही पाहावयास मिळतात. पोलीस प्रशासनाचीही यात हतबलता दिसून येते.
या पाश्र्वभूमीवर नागरिकांची वाढती नाराजी लक्षात घेता चार महिन्यांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे व महापौर अलका राठोड यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय बैठक होऊन त्यात महापालिकेच्या माध्यमातून डिजिटल फलकांवर बंधन घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे नागरिकांत स्वागतही झाले. परंतु प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी कधीच झाली नाही. उलट, त्यातून नवे वाद निर्माण झाले. महापालिकेचे आयुक्त अजय सावरीकर व त्यांचे प्रशासन कार्यक्षम नसल्यामुळे डिजिटल फलकांचे पेव संपुष्टात न येता कायम राहिले आहे. या डिजिटल फलकांमुळे काहीवेळा दोन गटात हाणामाऱ्या झाल्या तर काही वेळा जातीय तणावाचे प्रसंगही उद्भवले आहेत. याप्रकरणी पोलीस प्रशासनाची भूमिकाही बोटचेपेपणाची असल्याचे दिसून येते. यंदा शिवजयंतीला अद्याप १०-१५ दिवसांचा अवधी असताना आतापासूनच शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यांवर डिजिटल फलक झळकू लागले आहेत. या डिजिटल फलकांवर महाराजांच्या पुढे पुढाऱ्यांच्याही छबी आहेत. काही डिजिटल फलकांवर तर दमबाजीची तथा आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा वापरल्याचे दिसून येते. ‘असेल हिंमत तर अडवून दाखवा’, ‘नजरेला नजर भिडवायला मर्दाचे काळीज लागते’ ही त्यापैकी काही वानगीदाखल उदाहरणे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2013 रोजी प्रकाशित
सोलापुरात डिजिटल फलकांमुळे कायदा व सुव्यवस्थेला पुन्हा धोका
सार्वजनिक रस्त्यांवर वाढदिवस, उत्सव व इतर कोणत्याही कारणांवरून डिजिटल फलक (फ्लेक्स) लावण्यास महापालिका प्रशासनाने बंदी घातली असताना त्याप्रमाणे बंदीचा आदेश अमलात येत नाही. उलट, अशा डिजिटल फलकांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याचा प्रकार घडतो.
First published on: 07-02-2013 at 08:38 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Law order in danger due to digital boards in solapur