महिला लैंगिक शोषण प्रकरणी लक्ष्मण माने यांच्या पलायनवादी भूमिकेबद्दल दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी तीव्र शब्दात टीका केली. पाच महिलांचे अत्याचार झाल्याचे आरोप होत असताना माने लपून राहण्याने चळवळीचे नुकसान झाल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. दरम्यान माने यांनी स्वतहून पोलिसांसमोर हजर होत चौकशीला सामोरे गेले पाहिजे, अशी मागणी करतानाच संबंधित महिलांना संरक्षण देण्याची मागणी कोल्हापुरातील महिला, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आलेले दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी लक्ष्मण माने यांच्या पलायनवादी भूमिकेविरुध्द नाराजीचा सूर लावला आहे. ते म्हणाले, माने यांच्यावर पाच महिलांचे आरोप होणे हे धक्कादायक आहे. चळवळीत असणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आरोप झाले की त्याला सामोरे जाण्याची गरज आहे. त्यातून त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी उपलब्ध होत असते. मात्र ही संधी माने यांनी गमाविली आहे. यातून चळवळीचे नुकसान होते. त्यांनी चौकशीला स्वतहून सामोरे जावे, असे मत कवाडे यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही टीका
लक्ष्मण माने यांच्याविरुध्द त्यांच्या संस्थेतील पाच महिलांनी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये कोल्हापुरातील संस्थेमधील दोन महिलांचा समावेश आहे. नोकरीमध्ये कायम करण्यासाठी माने यांनी या महिलांचे शोषण केले असल्याची तक्रार आहे. तक्रार झाल्यापासून माने हे समाजासमोर आलेले नाहीत. तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठीही पुढे आलेले नाहीत. या पाश्र्वभूमीवर कोल्हापुरातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महिलांनी माने यांच्या वर्तणुकीवर टीका केली आहे.
महाराष्ट्रातील महिला संघटनांसाठी ही धक्कादायक बाब आहे, असा उल्लेख भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा प्रा. आशा कुकडे, डॉ. मेघा पानसरे यांनी पत्रकाव्दारे नोंदविला आहे. चळवळीत योगदान असणाऱ्या माने यांच्या विरोधात महिलांची लैंगिक शोषणाची तक्रार झाल्यावर खरेतर त्यांनी स्वतहून चौकशीस सामोरे जाणे अपेक्षित होते. त्यांचे अशा रीतीने न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर राहणे, हे लोकशाही व्यवस्था नाकारणारे आहे. या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्ष चौकशी झाली पाहिजे व काळात तक्रारदार महिलांवर कोणताही दबाव येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. माने यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपानंतर वंचितांच्या चळवळीची कोणतीही हानी होऊ नये याची जबाबदारी समाजातील इतर संघर्षशील घटकांची आहे, असे प्रा. कुकडे व डॉ. पानसरे यांनी म्हटले आहे.
प्रा. डॉ. रूपा शहा यांनीही लक्ष्मण माने यांच्या या प्रकाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. पाच महिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर माने यांनी लपून न राहता चौकशीसाठी स्वतहून पुढे येणे गरजेचे आहे. वंचित घटकांमध्ये महिलांचे स्थान आणखी खालच्या स्तरावर आहे. अशा महिलांवर प्रदीर्घ काळ लैंगिक शोषणाची तक्रार होणे लज्जास्पद आहे. पीडित महिलांना आधार देण्याचे व त्यांच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे. महिला संघटनांनी अशावेळी खंबीरपणे त्यांची बाजू घेणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपणे झाला पाहिजे. कोणाचाही दबाव न घेता न्यायाची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे.