नव्या वर्षांतही एलबीटीचा वाद सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून, महापालिका प्रशासनाने सक्तीची वसुली सुरू केल्याच्या निषेधार्थ व्यापारी महासंघाच्या वतीने सोमवारी लातूर ‘बंद’ची हाक दिली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने साथ दिली.
महापौर स्मिता खानापुरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन एलबीटीचा तिढा सुटला असल्याचे जाहीर केले होते. शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलणे होऊन त्यांच्या इच्छेनुसार दर निश्चित केल्याचे सांगून एलबीटीचा तिढा सुटल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून हे प्रस्तावित दर लागू करावेत, असे सरकारला कळवले असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी शहरातील अक्षता साडी सेंटर व सत्य इलेक्ट्रिकल्स या दोन ठिकाणी महापालिकेचे प्रभारी आयुक्त धनंजय जावळीकर यांच्या नेतृत्वाखाली एलबीटी वसुलीचे पथक पोहोचले व त्यांनी या दोघांना एलबीटीची रक्कम त्वरित भरण्याची ताकीद दिली. यावरून व्यापारी व महापालिका प्रशासनातील वाद उफाळला व त्यानंतर सायंकाळी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली.
व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींनी तातडीची बैठक घेऊन प्रभारी आयुक्त धनंजय जावळीकर यांच्या निषेधार्थ सोमवारी लातूर ‘बंद’ची हाक दिली व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातील व्यापाऱ्यांनी मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला. एलबीटीचे दर महापालिका व व्यापाऱ्यांत निश्चित झाले असले, तरी त्याची रीतसर गॅझेटमध्ये नोंद झाल्यानंतर पैसे भरू, व्यापारी १ एप्रिल २०१३ पासून एलबीटी भरतील. तोपर्यंत महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना कसलाही त्रास देऊ नये, एलबीटी भरण्याची सक्ती करू नये, प्रभारी आयुक्त धनंजय जावळीकर यांना निलंबित करण्यात यावे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोणताही त्रास देऊ नये, अशी भूमिका महापौर स्मिता खानापुरे, आमदार अमित देशमुख व सर्वच काँग्रेस नगरसेवकांनी घेतली आहे.
या प्रकरणी महापालिकेचे प्रभारी आयुक्त धनंजय जावळीकर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडे पैसे नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार प्रलंबित आहेत. आज ना उद्या व्यापाऱ्यांना एलबीटी भरावाच लागणार आहे. तो त्यांनी लवकरात लवकर भरला तर कर्मचाऱ्यांचेही पगार होतील आणि व्यापाऱ्यांकडेही एलबीटीची थकीत रक्कम वाढणार नाही. रक्कम वाढली तर ती एकरकमी भरण्याचा त्रास व्यापाऱ्यांनाच होणार असल्याचे जावळीकर म्हणाले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी उद्या (मंगळवारी) पुन्हा ‘बंद’चे आवाहन केले आहे. एलबीटीच्या विरोधात व्यापारी महासंघाने घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी व भाजपाने पाठिंबा दिला आहे.