युती व आघाडीतील काही नेत्यांनी अकोट, अकोला पूर्व, मूर्तिजापूर व बाळापूर या मतदार संघात बदल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येथील मतदार संघात अदलाबदलीचे वारे वाहत आहेत. हे बदल झाल्यास नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची चिन्हे आहेत. काही मतदार संघात शिवसेना, काँग्रेसचा वारंवार पराभव झालेला पाहता ही मागणी पुढे आली. काही राजकीय नेत्यांनी या बदलासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रयत्नांना निवडणूकपूर्व काळात यश मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक पुढील वर्षांत आहे. लोकसभा व जिल्हा परिषद निवडणूक पाहता मतदारसंघातील बदल नेत्यांच्या पथ्यावर पडतील, तसेच तत्पूर्वी या बदलावर शिक्कामोर्तब झाल्यास पक्ष कार्यकर्ते जोमाने कामास लागतील, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. अकोट मतदार संघात गेल्या पाच निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. शिवसेना व भारिप-बमसं यांच्याकडे हा मतदार संघ राहिला. यात काँग्रेसचा सतत होणारा पराभव पाहता राष्ट्रवादी या मतदार संघावर प्रबळ दावा करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या ताब्यातील या मतदार संघात भविष्यात राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी येथे दावेदारी करत असेल तर पक्ष नेतृत्वाला येथे सशक्त उमेदवार देऊन त्याला कामाला लागा, हे सांगण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी दिल्यास येथे अडचण निर्माण होऊ शकते.
बोरगावमंजू अर्थात, अकोला पूर्व मतदारसंघात शिवसेनेचा सलग तीनदा पराभव झाला. शिवसेनेचा झालेला हा पराभव पाहता भाजप दावेदारी दाखल करू शकतो. असे झाल्यास शहरी भागातील मतदारांचा फायदा पक्षाला होईल.
या मतदार संघात भारिप-बमसंचा सतत होणार विजय काँग्रेसला धक्का देणारा आहे. भारिप-बमसं येथे नव्या पर्यायांच्या शोधात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे इतर पक्षांनी जोरदार कंबर कसली असून ते कामाला लागले आहेत. काँग्रेसचा हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. या मतदार संघात राष्ट्रवादीचे तरुण नेते दावेदारी करण्यास इच्छूक आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये मत विभाजनाचा फायदा भारिप-बमसंच्या पथ्यावर पडतो. त्यामुळे समविचारी नेत्यांनी मत विभाजन थांबविल्यास भाजप व राष्ट्रवादी यांच्यापैकी एकास यश मिळण्याची शक्यता आहे.
जातीय समीकरण पाहता बाळापूर मतदार संघावर राष्ट्रवादी आपला दावा दाखल करू शकतो. येथे काँग्रेस उमेदवाराचा सतत होणारा पराभव ही दावेदारी प्रबळ करेल. मूर्तिजापूर सोडून बाळापूर, अकोला पूर्व व अकोट हे मतदार संघ राष्ट्रवादीच्या हिटलिस्टवर आहेत. जातीय समीकरणांवर हे सर्व निश्चित होईल. गेल्या चार निवडणुकीत काँग्रेस अकोला पश्चिममध्ये पराभूत होत आहे. पण, राष्ट्रवादीकडे सशक्त पर्याय नसल्याने येथे काँग्रेसचा उमेदवार उभा राहील. भाजप येथे उमदेवार बदलण्याची सुतराम शक्यता नसल्याने काँग्रेसला मराठी भाषिक उमेदवाराचा आधार यंदा घावा लागेल, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.