राज्य दुष्काळातच असावे अशी काही पुढाऱ्यांची अलीकडे मानसिकता बनली आहे. सध्याचे दुष्काळाचे संकट नैसर्गिकपेक्षा राज्यकर्त्यांनीच अधिक ओढवून घेतले असल्याची टीका करत नगर जिल्ह्यात तीन मंत्री असतांना जिल्ह्यातल्या पाणी योजना कोठे अडल्या याचा अभ्यास होत नसल्याची खंत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विखे व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज संयुक्त दौरा केला. पठारभागातील वरवंडी, साकूर, हिवरगाव पठार, खंडेरायवाडी, िपपळगाव देपा आदी गावांना भेटी देऊन त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. सर्वश्री बापूसाहेब गुळवे, वसंतराव देशमुख, सुदाम सानप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय फड व अमर कतारी, साहेबराव वलवे आदी त्यांच्यासमवेत होते.
दौऱ्यानंतर सायंकाळी नेहरु उद्यानात शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉ. सहाणे मास्तर होते. मेळाव्यात बोलतांना विखे म्हणाले, टंचाईग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय तत्वाने पुढे आले पाहिजे. किमान दुष्काळाच्याबाबत तरी राजकारण करु नये. सध्याच्या पुढाऱ्यांना सत्ता, खुर्ची आणि पैसा यामुळे राजकीय विचार राहीलेला नाही. श्रीगोंद्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी पथके जातात मात्र संगमनेरात खुलेआम वाळुतस्करी होत आहे. जनावरांसाठी छावण्या नाहीत, चाऱ्यातही अनागोंदी आहे. टँकरची मागणी असतांनाही टँकर दिले जात नाहीत. मनरेगाची कामेही कोठे चालु नाहीत. तालुके नामदार, खासदार, आमदार यांना आंदण दिल्याचे चित्र सर्वत्र आहे.
खासदार वाकचौरे म्हणाले, सरकारला जाग करण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून करीत आहोत. पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावात कामे सुरु करण्याचे आदेश आहेत मात्र अद्यापही कामे सुरु झालेली नाहीत. पैशाची अडचण नसतांनाही मागणीप्रमाणे दुष्काळावर उपाययोजना होत नाहीत. दुष्काळी उपाययोजना व्हाव्यात यासाठीच विखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर दौरा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.