उद्यापासून ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रम
शहरातील साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठसा उमटविणाऱ्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ अर्थात ज्ञान उत्सवास यंदा रविवारपासून सुरुवात होत असून, कार्यक्रमाचे पहिले पुष्प महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड गुंफणार आहेत. ‘मी आणि विश्वकोश-अर्थात यशाचा राजमार्ग’ या विषयावर त्या बोलणार आहेत.
नवनीत पब्लिकेशन्स आणि ज्योती स्टोअर्स यांच्या वतीने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. मराठी साहित्याचा प्रसार आणि प्रचार तसेच नामवंत साहित्यिकांना भेटण्याच्या हेतूने सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा १४ व्या वर्षांत पोहोचला आहे. दोन महिने चालणाऱ्या या ज्ञान उत्सवात विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये ३१ ऑगस्ट रोजी स्ट्रेटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांची ‘एका दिशेचा शोध’ आणि ‘नव्या युगाचा आरंभ’ या पुस्तकाच्या आधारे ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर हे मुलाखत घेतील.
ज्येष्ठ पत्रकार व लेखक अंबरिश मिश्र हे १ सप्टेंबर रोजी ‘शंभर वर्षांची सुंदरी’ विषयावर विचार मांडतील. याशिवाय ७ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे (नाटक-लेखन ते प्रयोग एक प्रवास), ८ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे (यशवंत चव्हाणांचा जीवनपट-सह्य़ाद्री ते हिमालय), २१ सप्टेंबर रोजी पुण्याचे वास्तुतज्ज्ञ डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे (आनंददायी जीवनासाठी वास्तुशास्त्र), २२ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे (कोसला ते हिंदू), २८ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ क्रीडा वैद्यकतज्ज्ञ डॉ. राजीव शारंगपाणी यांची ‘आनंददायी जीवनशैली कशी असावी’ या विषयावर डॉ. वृंदा भार्गवे मुलाखत घेतील. २९ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक (दुर्मीळ स्लाइड शोसह ‘भारताच्या चंद्र आणि मंगळ मोहिमा), ३० सप्टेंबर रोजी ज्येष्ठ कवी दासू वैद्य (कवितेसोबत) या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
या उपक्रमातील सर्व कार्यक्रम जुना गंगापूर नाक्यावरील शंकराचार्य न्यासातील कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहेत. नाशिककरांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार तसेच नवनीत पब्लिकेशन्सचे संचालक जितूभाई गाला, जे. के. संपत यांनी केले आहे.