शेवंताई पब्लिकेशनच्या वतीने स्मृतिशेष हंबीर अंगार लिखित ‘महानायक सम्राट अशोक’ या महानाटय़ाच्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडले. विशेष अतिथी म्हणून विजयालक्ष्मी रामटेके होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक दादाकांत धनविजय, सुजाता रंगारी, एन.व्ही. ढोके, वंदना जांभुळकर उपस्थित होते.
सम्राट अशोक यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना विजयालक्ष्मी रामटेके म्हणाल्या, युद्धाने कुणालाच जिंकता येत नाही. विजयी होण्यासाठी शांती, प्रेम आणि अहिंसा याचीच गरज असते. असा विचार मांडणारा पहिला सम्राट म्हणजे अशोक आहे. हंबीर अंगार यांनी दहा वर्षांच्या अभ्यासानंतर या नाटकाची निर्मिती केली आहे. सम्राट अशोकाच्या चरित्रातून बौद्ध तत्त्वज्ञानाचाच प्रसार करण्याचा व नव्या पिढीपर्यंत ते नाटकाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे रामटेके म्हणाल्या. शासकाने कसे राहावे, कुठली नीतीमूल्ये राखावी, संयम ठेवावा, हे सर्व या चरित्रातून समोर येते. माणूस कुठल्याही धर्माचा असो, त्याने भगवान बुद्धाने दिलेल्या पंचशीलावर चालावे, असे वातावरण आपल्याला निर्माण करावयाचे आहे. कारण बौद्ध धम्मच संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकतो. बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध आपल्या अंतरंगात जागविता आला नाही तर जयंती, पुण्यतिथी साजरी करून काम होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
आमची पिढी नाटय़क्षेत्रात मोठय़ा जोमाने आली. नाटकात नाव मिळवणे हा त्यामागचा उद्देश नव्हता तर नाटकांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला समोर नेण्याचा तो प्रयत्न होता. दलित नाटकांची एक चळवळ त्या निमित्ताने आम्हाला मोठी करता आली. हंबीर अंगार यांनी लिहिलेले आणि अशोक जांभुळकर यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक त्याच चळवळीचा भाग असल्याचे दादाकांत धनविजय यावेळी म्हणाले. प्रकाशिका वंदना जांभुळकर यांनी या पुस्तकामागची भूमिका सांगितली. संचालन अशोक जांभुळकर यांनी केले, यावेळी समाजकार्य पदवीचे प्रथम वर्षांचे शिक्षण घेणारी गरीब विद्यार्थिनी रोशनी कुमरे हिला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. ही शिष्यवृत्ती गेल्या दहा वर्षांपासून सुजाता रंगारी देत आहेत.