.. अन्यथा पाच हजार रुपये दंड
सावधान! तुम्ही कुत्रा पाळत असाल आणि त्याचा अधिकृत परवाना नसेल तर तुम्हाला पाच हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. कारण, ठाणे महापालिका प्रशासनाने पाळीव कुत्र्यांचा परवाना नसलेल्या नागरिकांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाळीव कुत्र्यांच्या परवाना शुल्क दरातही वाढ करण्यात येणार असल्याने नागरिकांना आता १०० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. या संदर्भात महापालिका प्रशासनाने रीतसर प्रस्ताव तयार करून येत्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या विषय पत्रिकेवर अंतिम मंजुरीसाठी आणला आहे.
पाळीव कुत्र्यांना आवश्यक लस न दिल्यास नागरिकांना वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून मुंबई प्रांतिक अधिनियमाच्या आधारे पाळीव कुत्र्यांसाठी नियम लागू केले आहेत. मात्र, बहुतेक नागरिकांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे नियम अधिक कठोर करण्याचा विचार महापालिका प्रशासन करीत आहे. तसेच महापालिकेकडून पाळीव कुत्र्यांसाठी रीतसर शुल्क आकारून अधिकृत परवाने देण्यात येतात. त्यासाठी वर्षांकाठी १०० रुपये भरावे लागतात. मात्र, बहुतेक नागरिक पाळीव कुत्र्यांसाठी परवाना घेत नाहीत, असेही महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाळीव कुत्र्याचा परवाना घ्यावा, या उद्देशातून महापालिकेच्या आरोग्य विभागाने नवा प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. नव्या प्रस्तावानुसार, पाळीव कुत्र्याच्या परवान्यासाठी १०० ऐवजी २०० रुपये आकारण्यात येणार आहेत. तसेच बिल्ला, परवाना पुस्तक, कुत्रा महापालिकेच्या श्वानघरामध्ये ठेवणे यासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहेत. जुन्या दरानुसार, दहा ते २० रुपये द्यावे लागत होते. त्यामुळे आता नव्या दरानुसार ३० ते ४० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे परवाना नूतनीकरण न केल्यास दर महिन्याला २० ऐवजी ५० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. हे नवे दर तीन वर्षांकरिता लागू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे परवाना सुरक्षा अनामत रक्कम शुल्काच्या पाच पट करण्यात आली आहे. तसेच परवाना न घेता कुत्रे पाळणाऱ्यांकडून पाच हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत शुल्क न भरल्यास सुरक्षा अनामत रक्कम महापालिकेच्या फंडात जमा होईल, तसेच त्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.