अॅडव्हॉटेजच्या निमित्ताने विदर्भात नव्या उद्योगांसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरले जात असले तरी उद्योगांची संख्या भरपूर असलेल्या चंद्रपूर जिल्हय़ावर आता ’पुरे झाले’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. उद्योगांचा ओघ चंद्रपूरऐवजी गडचिरोलीकडे वळवण्याची गरज असल्याचे मत येथे व्यक्त होत आहे.
राज्याच्या इतर प्रदेशाच्या तुलनेत मागास असलेल्या विदर्भात आणखी उद्योग यावेत या हेतूने राज्य शासनाच्या पुढाकाराने आजपासून नागपुरात ‘अॅडव्हाँटेज विदर्भ’ औद्योगिक परिषद सुरू झाली. दोन दिवसाच्या या परिषदेत विदर्भात अनेक उद्योगांनी येण्याची तयारी दाखवली असली तरी या जिल्हय़ावर मात्र आता नको असे म्हणण्याची वेळ आली आहे. संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर अशी चंद्रपूरची ओळख झाली आहे. मोठय़ा संख्येत उद्योगांची स्थापना झाल्यामुळे या जिल्हय़ावर ही वेळ आली आहे. २२ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्हय़ात १२ लाख नागरिक वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, राजूरा व गडचांदूर या सरळ रेषेत येणाऱ्या भागात राहतात. या सर्वाना कमालीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. वर्धा नदीच्या खोऱ्यात असलेल्या या भागात अगदी रांगेने कोळसा खाणी, लोखंड व सिमेंट उद्योग, वीज निर्मिती प्रकल्प उभे आहेत. याशिवाय आणखी किमान ४० नवे खासगी प्रकल्प याच भागात येऊ घातले आहेत. याशिवाय एमआयडीसीने भद्रावतीत आणखी एक वीज प्रकल्प उभारण्याची घोषणा नुकतीच केली आहे. वध्रेचे खोरे अशी ओळख असलेल्या या भागात उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध असल्या तरी या भागाने आणखी किती नव्या उद्योगांना सामावून घ्यायचे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या जिल्हय़ातून सध्याच्या घडीला ३५०० मेगाव्ॉट वीज निर्मिती होते. त्याची दाहकता नागरिकांना सहन करावी लागते. त्यामुळे आता नवीन उद्योग नको, अशी भूमिका येथील अनेक संघटनांनी घेतली आहे. मध्यंतरी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या जिल्हय़ात नवीन उद्योगांवर बंदी घातली होती. ही बंदी नंतर हळूच उठवण्यात आली. प्रगतीसाठी उद्योग हवे हे तत्व मान्य असले तरी त्याची झळ सोसणाऱ्या लाखो नागरिकांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न ग्रीन पीस सोसायटीचे सुरेश चोपणे यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना उपस्थित केला. वर्धा खोरे वगळले तर जिल्हय़ाच्या इतर भागात भरपूर जंगल आहे. यात ताडोबाचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे तिथे उद्योग येण्याची शक्यता नाही. भविष्याचा विचार करता आता या जिल्हय़ात वीज निर्मिती प्रकल्प नकोच, अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे.
चंद्रपूरला लागूनच गडचिरोली जिल्हा आहे. उद्योगविरहीत अशी ओळख असलेल्या या जिल्हय़ात विपुल खनिज संपत्ती आहे. जंगला खालच्या भूगर्भात लोहखनिजाचे मोठे साठे दडले आहेत. संपूर्ण देशाला आणखी शंभर वर्ष पुरेल एवढे लोहखनिज या एकटय़ा गडचिरोली जिल्हय़ात आहे.
या खनिजावर आधारित उद्योग या जिल्हय़ात उभारले जाणे गरजेचे आहे. आतापर्यंत ८ मोठय़ा उद्योग समूहांनी या लोहखनिजाची लीज मिळवली असूनही नक्षलवाद्यांच्या अस्तित्वामुळे त्यांना अजूनही उत्खनन करता आले नाही. नक्षलवादावर नियंत्रण मिळवले तर या जिल्हय़ात नव्या उद्योगाची उभारणी शक्य आहे असे मत एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2013 रोजी प्रकाशित
चंद्रपूर जिल्ह्य़ावर प्रचंड भार; नवीन उद्योग आणण्यात विरोध
अॅडव्हॉटेजच्या निमित्ताने विदर्भात नव्या उद्योगांसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरले जात असले तरी उद्योगांची संख्या भरपूर असलेल्या चंद्रपूर जिल्हय़ावर आता ’पुरे झाले’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. उद्योगांचा ओघ चंद्रपूरऐवजी गडचिरोलीकडे वळवण्याची गरज असल्याचे मत येथे व्यक्त होत आहे.
First published on: 26-02-2013 at 02:59 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lots of work weight on chandrapur distrect