राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्य़ात हत्तीरोग दूरीकरण सामूहिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येत आहे. नागपूर ग्रामीणमध्ये १४ ते १६ डिसेंबपर्यंत तर शहरी भागात १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना गोळ्या खाऊ घालाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या मोहिमेत अंगणवाडी कार्यकर्ता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब व इतर स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. आतापर्यंत राबवण्यात आलेल्या सर्व आरोग्यविषयक मोहिमेपेक्षा ही मोहीम मोठी राहणार आहे. या मोहिमेत २९ लाख ९ हजार ५५४ लाभार्थ्यांना औषधोपचार करण्यात येणार आहे. यात ग्रामीण भागातील १७ लाख ५० हजार ७९१ तर शहरी भागात ३ लाख २१ हजार ७६३, शहरी भागातील ३ लाख २१ हजार ७६३ तसेच नागपूर महापालिका क्षेत्रातील ८ लाख ३७ हजार लाभार्थ्यांना ‘डीईसी’ व ‘अल्बेंडाझोल’ गोळ्या खाऊ घातल्या जाणार आहे. यासाठी ५४३४ चमू तयार करण्यात आल्या असून ५४४ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी ७४ लाख ७३ हजार ८८६ डीईसी गोळ्या तर २९ लाख ९ हजार ५५४ अब्लेंडाझोल गोळ्यांची आवश्यकता भासणार आहे.
एकही पात्र लाभार्थी औषधोपचारापासून वंचित राहू नये यासाठी स्थलांतरीत मजूर वर्ग, भटक्या लोकांचे समूह औषधोपचार देण्याबाबतच्या स्पष्ट सूचना सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गावपातळीवर लोकांच्या सहभागासाठी ग्रामसभा घ्यावी तसेच दवंडीद्वारे प्रत्येक गावात सामूदायिक औषध मोहिमेचा प्रचार करावा, तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून मोहिमेचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढावी, असा सूचना जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.