नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्य़ांत कापूस व धानावर मोठय़ा प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणी तूर व सोयाबीनही कीडींच्या विळख्यात सापडले आहे. दोन दिवसात पावसाने उंसत घेतल्याने शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. अतिवृष्टीने नुकसान होऊनही धान पीक वाचविण्यासाठी शेतक ऱ्यांची धडपड सुरू आहे.
पूर्व विदर्भातील धान पट्टा म्हणून ओळखले जाणाऱ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्य़ांत धानावर पाने गुंडाळणारी अळी, खोडकीड, गादमाशी, लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. वर्धा जिल्ह्य़ात मावा, तुडतुडय़ांनी कापसाचे नुकसान केले आहे. नागपूर जिल्ह्य़ात सोयाबीनवर चक्रीभुंगा, कापसावर रस शोषण करणारी अळी आणि तुरीवर पाने खाण्याऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे. भंडारा जिल्ह्य़ात पाने गुंडाळणारी अळी, खोडकीड, गादमाशी व लष्करी अळीने धानाचे नुकसान होत आहे. विभागातील पिकांवर करप्या रोगाचाही प्रकोप आहे. गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्य़ांतही धान पिकांची स्थितीही फारसी चांगली नाही.
सोयाबीनवर तंबाखूची पाने खाणारी अळी, उंट अळी व चक्रीभुंगा या कीडींचा प्रादुर्भाव आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील मुलचेरा तालुक्यात धान पिकांचे कीडींनी नुकसान केले आहे. दोन दिवसात पावसाने उसंत घेतल्याने शेतक ऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात इतर पिके हातची गेली असली तरी धान पिकाबाबत अजूनही शेतकऱ्यांना उत्पादनाची मोठी आशा आहे. सप्टेंबरमध्ये विभागात गडचिरोली जिल्ह्य़ात सर्वाधिक  ८७.६ मि.मी. पाऊस झाला. वर्धा जिल्ह्य़ात ५८.९, नागपूर ६८.३, भंडारा ५०.९, गोंदिया ५९ तर चंद्रपूर जिल्ह्य़ात ५२.८ मि.मी. पाऊस झाला आहे.