जिल्हास्तरावर घर कामगार मोलकरणींचे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन वीज कर्मचारी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष कॉ. अरुण म्हस्के यांनी केले आहे. आयटक संलग्न नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेच्या वतीने जनश्री विमा योजना अंतर्गत शिष्यवृत्ती वाटपप्रसंगी ते बोलत होते.
२५ वर्षे संघर्ष करून महाराष्ट्र शासनाला घरकामगार मोलकरणींच्या कल्याणकारी मंडळाची स्थापना करावयास भाग पाडण्यात आले. आता विविध योजना प्रभावीपणे राबवायच्या असल्यास स्वतंत्र कर्मचाऱ्यांसह जिल्हा स्तरावर मोलकरणींचे मंडळ निर्माण केले पाहिजे, असे ते म्हणाले. आयटक संलग्न नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेच्या ८२ पाल्यांना प्रत्येकी ६०० रुपयांच्या धनादेशांचे वाटप तसेच डॉ. ललिता जोशी यांच्या वतीने मोलकरणींच्या दोन मुलींना पाच हजार रुपये शैक्षणिक मदतीचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य सचिव कॉ. राजू देसले होते. देसले यांनी मोलकरीण मंडळ प्रत्येक जिल्ह्य़ात स्थापन होण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. गौरी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी नायडू, अ‍ॅड. राजपाल शिंदे, जिल्हा अध्यक्षा संगीता उदमले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली साळी यांनी केले. आभार शोभा चव्हाण यांनी मानले.