मोहम्मद अली रोड येथील एका कार्यालयात ‘बुरखाधारी महिले’ने केलेल्या चोरीचा छडा पायधुनी पोलिसांनी लावला आहे. हा बुरखाधारी चोर म्हणजे याच कंपनीच्या मालकाचा वाहनचालक होता.
 मोहम्मद अली रोडवरील टोपीवाला इमारतीच्या परवेज अब्दुल कादर खत्री यांचे आयात निर्यातीचे कार्यालय आहे. मागील आठवडय़ात त्यांच्या कार्यालयातून अडीच लाख रुपयांची चोरी झाली होती. चोराने कार्यालयाचे कुलूप उघडून कपाटातील रक्कम चोरली होती. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखाधारी महिला चोरी करत असल्याचे दिसत होते. पायधुनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. कार्यालयातील कुलूप उघडून चोरी झाली होती. त्यामुळे माहितगार किंवा कार्यालयातील कुणीतरी ही चोरी केली असावी, अशी पोलिसांनी खात्री पटली. पण कार्यालयात महिला कुणी नव्हती. आम्ही या सीसीटीव्ही फुटेजमधील बुरखाधारी व्यक्तीचे निरीक्षण केले असता पुरूषी चाल वाटली. त्या आकृतीच्या देहबोलीवरून तसेच उंचीवरून कार्यालयातील तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि मुस्ताक फक्रुद्दिन शेख (३५) याला अटक केली, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय खुपेरकर यांनी दिली.
कर्जबाजारीपणामुळे केली चोरी.
मुस्ताक शेख हा याच कंपनीचे मालक खत्री यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करतो. त्याची पत्नी त्यांच्या घरी काम करते. तर त्याचे वडीलही याच ठिकाणी पूर्वी वाहनचालक म्हणून काम करायचे. तो वडाळा येथे रहातो. त्याच्यावर कर्ज झाल्यामुळे त्याला पैशांची चणचण होती. मागील आठवडय़ात त्याने मालकाच्या नकळत कार्यालयाची चावी लंपास केली होती. त्याच रात्री घरी येऊन त्याने पत्नीचा बुरखा घातला तसेच पत्नीची पर्सही सोबत घेतली. त्याने कपाटातील अडीच लाख रुपये चोरले. दुसऱ्या दिवशी चावी त्याच जागेवर ठेऊनही दिली. विशेष म्हणजे त्याला अटक केल्यानंतर त्याचाच मालक खत्री याने जामीन देऊन त्याची सुटका केली.