* नियोजन समितीची चर्चाही वाया
* माणकोली, डोंबिवली, बाळकूम पट्टय़ात नासधूस
* प्रशासन सुस्त, आमदार नाराज
विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील तिवरांच्या जंगलांची कत्तल थांबवा, या पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आदेशाला जिल्हा प्रशासनाने अक्षरश: केराची टोपली दाखवली असून नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर घसा कोरडा करणाऱ्या आमदार, खासदारांनाही जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या भागात काम करणारे तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकारी वाकुल्या दाखवत असल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे पुढे येऊ लागले आहे. ठाणे-नाशिक महामार्गावर माणकोलीपर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण खाडीकिनाऱ्यावर डेब्रीज माफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असताना डोंबिवलीतील मोठागाव भागातील खारफुटी नष्ट करण्याचे कामही सर्वाच्या डोळ्यांदेखत सुरू आहे. मुंब्रा रेतीबंदरावर वर्षांनुवर्षे सुरू असलेला अनधिकृत रेती उपसाही जिल्हा प्रशासनाला नवा नाही. असे असताना या मुद्दय़ावर नियोजन समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होऊनही तिवरांची कत्तल सुरूच असल्याचे चित्र दिसू लागले आहे.  
डोंबिवलीतील पश्चिम पट्टय़ात कोपर रेल्वे स्थानक परिसरात रेती माफियांचा गेल्या काही दिवसांपासून धुडगूस सुरू आहे. या भागात खाडीकिनारी असलेल्या खारफुटीच्या जंगलांची दिवसाढवळ्या कत्तल सुरू आहे. येथे अनधिकृतपणे रेती उपसा सुरू ठेवून रेल्वे मार्ग तसेच कोपर भागापर्यंत घुसखोरी केली आहे. मोठागाव रेतीबंदर खाडीकिनारी खारफुटीच्या झाडांची तोड करून त्या भागावर मातीचे भराव टाकण्याचे काम भूमाफियांच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे. या भूमाफियांवर तातडीने कारवाई करून खारफुटीची तोड थांबवावी, अशी मागणी जोर धरू लागली असताना जिल्हा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर माणकोली भागात खाडी बुजवून तिवरांची विस्तीर्ण जंगले कापून काढण्याचे सत्र आजही सुरू आहे. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर भागातून डेब्रीजने भरलेल्या गाडय़ा खाडीकिनारी रीत्या होत असून त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी वेलारसू हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचीत आहेत. असे असताना त्यांच्या डोळ्यांदेखत तिवरांची जंगले कापली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून स्थानिक तहसीलदार याकडे दुर्लक्ष करत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे.
पालकमंत्र्यांचे आदेशही धाब्यावर
माणकोली, डोंबिवली भागातील खाडीकिनाऱ्यांवर तिवरांची कत्तल सुरू असल्याचा मुद्दा यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निघाला होता. मुंबई-नाशिक महामार्गावर विशेषत: माणकोली पट्टय़ात खारफुटी बुजवून त्यावर उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत बेटाचा मुद्दा विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी जोरकसपणे मांडला होता. त्यावर ही कत्तल थांबवावी, असे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. ठाणे जिल्ह्य़ातील खाडीकिनारी कोणत्याही स्वरूपाची अनधिकृत भरणी होऊ देऊ नका आणि तिवरांची कत्तल थांबवा, असे आदेश नाईक यांनी दिले होते. याशिवाय यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र कारवाईचा कोणताही अहवाल अद्याप नियोजन समितीपुढे मांडण्यात आला नसून सदस्य असलेल्या आमदार, खासदार यांनाही तो मिळालेला नाही, अशी माहिती निरंजन डावखरे यांनी वृत्तान्तला दिली. दरम्यान, लोकसत्ताने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर माणकोली भागात डेब्रीज वाहून आणणाऱ्या डम्परचे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही या ठिकाणी खाडी बुजविण्याचे उद्योग सुरू आहेत, अशी माहिती या भागातील काही ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, ठाण्याच्या जवळ असलेल्या बाळकूम-कालेर भागातही अशाच प्रकारे खारफुटीची कत्तल सुरू असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.