नगरपालिकेने सुमारे दोन कोटी रूपयांची थकबाकी न भरल्याने ३८ दिवसांपासून महावितरणने शहरातील पथदीपांचा वीज पुरव़ठा बंद केला आहे. मंगळवारी यासंदर्भात ऊर्जामंत्री अजित पवार यांनी मध्यस्ती केल्यानंतर पथदीप सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु बुधवापर्यंत पथदीपांचा वीज पुरवठा सुरू झालेला नसल्याने मनमाडचे रस्ते अंधारातच होते.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मंगळवारी बंद पथदीपासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याने रस्ते पुन्हा उजळून निघतील अशी अपेक्षाही आ. पंकज भुजबळ यांनी व्यक्त केली होती. मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या सोबत आपली मंगळवारी व बुधवारी बैठक झाली. चर्चा झाली. परंतु पथदीप सुरू करण्यासंदर्भात कोणतेही आदेश वरिष्ठांकडून आपल्याला बुधवारी सायंकाळपर्यंत मिळाले नाहीत, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद सोनकुसळे यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी खास बाब म्हणून व पालिकेकडून काही बाबींवर हमी घेऊन पथदीपांचा विद्युतपुरवठा तातडीने सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती भुजबळांचे स्वीय सहाय्यक रमेश मराठे यांनी दिली होती. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आणि त्यांचे सचिव शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तांत्रिक बिघाड झालेल्या मीटरवरून जादा देयक पालिकेला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यातील १८ लाख रुपये कमी करण्याचा तसेच पथदीपांचा वीज पुरवठा त्वरीत सुरू करण्याचा निर्णय मंत्रालयात झाल्याचे आपल्याला आतापर्यंत तरी माहिती नसल्याचे नगराध्यक्ष धणेश धात्रक यांनी नमूद केले. नांदगाव पालिकेला पथदीपांच्या थकीत देयकापोटी १३ व्या वित्त आयोगातील रकमेतून पैसे भरावे लागले. मनमाड पालिकेलाही महावितरणचे ७५ लाख रुपये भरण्यास सांगितले.
पालिकेने १० लाख रुपये भरण्याची तयारी दर्शविली. परंतु देयक तपासल्यानंतर काही ठिकाणी १० पट जादा रक्कम दर्शविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही थकबाकी बेकायदेशीर असल्याची बाजू नगराध्यक्ष धात्रक यांनी मांडली. थकीत वीज देयकांच्या तडजोडीचा निर्णय हा राज्यपातळीवर घ्यावा लागणार असल्याने सुमारे ३८ दिवस हे घोंगडे भिजत पडले. त्यातच आचारसंहिता लागू झाली असली तरी मनमाडसाठी अपवादात्मक निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही न झाल्याने शहरातील रस्ते अंधारातच आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
मनमाडमधील रस्ते अजूनही अंधारात
नगरपालिकेने सुमारे दोन कोटी रूपयांची थकबाकी न भरल्याने ३८ दिवसांपासून महावितरणने शहरातील पथदीपांचा वीज पुरव़ठा बंद केला आहे
First published on: 07-03-2014 at 12:29 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmad roads plugs into darkness