सिनेमाची फॅक्टरी सुरू होऊन या वर्षीच्या मे महिन्यात शंभर वर्ष पूर्ण होतील. सिनेमासृष्टीसाठी हे वर्ष फार महत्त्वाचे आहे. शतकी वाटचाल पूर्ण करत असताना नव्या युगात, नव्या शतकात चांगल्या बदलांची नांदी व्हायलाच हवी.
योगायोगाने मागच्या वर्षांत काही मोजके मराठी चित्रपट वगळता फोर काही हाती लागले नव्हते. मात्र, यावर्षी
प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांवर एक नजर टाकली तर आशय आणि तंत्राच्या बाबतीत चांगले बदल नक्कीच अनुभवायला मिळणार आहेत. बीपी, हाच दिवस माझा, पुणे ५२, आजोबा, डॉ. प्रकाश आमटे द रिअल हिरो, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. हे चित्रपट आणि त्यांच्या दिग्दर्शकांची एक ओळख..
बीपी’ ‘सेक्सबद्दल किंवा लैंगिक शिक्षणाबद्दल मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे. आता माझं व्यक्त होण्याचं माध्यम आहे चित्रपट. मग मी या माध्यमाद्वारे या विषयाला वाचा फोडली’
– दिग्दर्शक रवि जाधव
‘बीपी’ अर्थात ‘बालक-पालक’ या चित्रपटाचा विषय खरोखरच बोल्ड आहे. पौगंडावस्थेतील मुले आणि लैंगिक शिक्षण हा परंपरा की आजचे वास्तव अशा कात्रीत सापडलेला विषय आहे. ‘गमभन’ या एकांकिकेवरून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा विषय हे जसं त्याचं वैशिष्टय़ तसंच या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे हेही विशेष. आशयाप्रमाणेच निर्मितीतली श्रीमंतीही या चित्रपटात ठासून भरली आहे. बॉलिवुडमधील प्रसिध्द संगीतकार जोडी विशाल-शेखर यांनी ‘बीपी’ला संगीत दिलं आहे. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ नंतर दिग्दर्शक म्हणून रवि जाधवकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या होत्या. मात्र, आपल्या पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा संपूर्ण पणे वेगळा विषय देण्याचे धाडसी पाऊल उचलत या रवि जाधवने यावर्षी बीपीची सलामी दिली आहे.
‘आजचा दिवस माझा’
‘हातात सत्ता असेल, मुख्यमंत्री हे पद असेल तर त्या पदाचा वापर करून आपण खरोखरच सामान्य
माणसासाठी काम करू शकतो का आणि करतो का?’, याची प्रतिकात्मक कथा म्हणजे आजचा दिवस माझा हा चित्रपट आहे’.
– दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी
त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर राजकीय पाश्र्वभूमीवरचा हा चित्रपट असला तरी तो पूर्णत वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची परिस्थिती डळमळीत झाली आहे.
आपली खुर्ची वाचवण्याच्या प्रयत्नात दिल्लीवारीवर असलेल्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींकडून खुर्ची परत मिळते. पण, त्यानंतर काय.. ही राजकारण्यांची ही कथा आहे आणि ज्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली आहे त्या लोकांची, त्या लोकांशी असलेल्या या राजकारण्यांच्या नात्याची ही कथा आहे.
सचिन खेडेकर, महेश मांजरेकर या दोन मोठया कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींचा चित्रपट ही त्याची महत्त्वाची ओळख. गेल्यावर्षी ‘तुकाराम’ सारखा चरित्रपट आणि आता राजकीय पट पुन्हा एक नवा विषय, नवे आव्हान.
‘पुणे ५२’
रहस्यपट आणि गुप्तहेर या दोन्ही शब्दांचा मराठी चित्रपटांशी फारसा संबंध आलेला नाही. म्हणजे हिंदीत आता ‘एक था टायगर’पासून आगामी ‘डेव्हिड’पर्यंत एकापाठोपाठ एक गुप्तहेरांवर चित्रपट येत आहेत. पुणे ५२ हा चित्रपट एका गुप्तहेराच्या आयुष्याभोवती फिरतो. निखिल महाजन या नवोदित दिग्दर्शकाच्या या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. गिरीश आणि उमेश या जोडीचे चित्रपट म्हटले की एक पठडी आणि त्याच त्याच कलाकारांचे चेहरे या गोष्टी डोळयासमोर येतात.
पुणे ५२ मध्ये या सगळ्या गोष्टींना फाटा दिला आहे. म्हणजे यात गिरीश मुख्य भूमिकेत असला तरी चित्रपटाची कथाच वेगळी असल्याने त्याचे वेगळे रूप आपल्याला पहायला मिळणार आहे. याशिवाय, यात सोनालीच्या जोडीने सईलाही प्रवेश मिळाला आहे. पुणे ५२ चे पोस्टर्स आणि प्रोमोज पाहिले तरी हा चित्रपट वेगळा असल्याचे लक्षात येते.
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं..’
या रस्त्यावर चालत असता वाटत राही, त्या रस्त्याने गेलो होतो असेच काही, दुविधा इथली अजून काही संपत नाही या कवी सौमित्र यांच्या ओळी माझ्या चित्रपटाची संकल्पना उलगडत जाते – दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी
अभिनेत्री म्हणून कार्यरत असले तरी बऱ्याच कालावधीपासून महिला आणि कुटूंब या विषयाच्या अनुषंगाने वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून मोठय़ा प्रमाणावर सातत्याने लेखन करतेय. हे लेखन करीत असताना जाणवत गेले की लग्नसंस्था, त्याविषयी लोकांचे विचार बदलत चालले आहेत. गेल्या दहा वर्षांत याचे अनेक पैलू पाहायला मिळालेत. सर्व वयोगटांतून लग्नसंस्थेकडे कसे पाहिले जातेय, त्याचे परिणाम होत आहेत. घटस्फोटाचे तसेच एकेरी पालकत्वाचे प्रमाण वाढतेय. आपल्या भवताली हे घडत असल्याने त्यावर चित्रपट करावा असे मनापासून वाटले आणि म्हणूनच दिग्दर्शनात आले. एक परिपक्व प्रेमकथेची पाश्र्वभूमी सिनेमात आहे. लग्न करताना लोक लाखो रुपये खर्च करतात. परंतु, ते लग्न टिकावं, टिकवायचं आहे यासाठी प्रयत्न आणि वेळ खर्च केला जात नाही. त्याचा विचार मांडण्याचा प्रयत्न ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा चित्रपटातून केला आहे. लहान मुले, तरुण मुली-मुले, ३० ते ४० वर्षांची दाम्पत्ये, वृद्ध आई-वडील असे सगळेजण लग्नसंस्थेकडे कसे पाहतात हा दृष्टिकोनही चित्रपटात आहे.
‘आजोबा’‘माणूस आणि प्राणी यांचं सहअस्तित्व नेमकं कुठे येऊन थांबतं? आपण निसर्गाच्या किती जवळ आहोत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘आजोबा’च्या निमित्ताने मी केला आहे’.
– दिग्दर्शक सुजय डहाके
‘शाळा’ ते ‘आजोबा’ सुजयने दुसऱ्याच चित्रपटात फार मोठी झेप घेतली आहे. ‘शाळा’ या चित्रपटाने सुजयने नवोदित दिग्दर्शक म्हणून सुरूवात केली पण, दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेला सुजय आज मराठीतला प्रयोगशील आणि प्रसिध्द दिग्दर्शक आहे. ‘आजोबा’ या नावावरून हा चित्रपट आजोबा आणि नातवाच्या कथेवर फिरतो की काय, असा एक गैरसमज होऊ शकतो. मात्र, ‘आजोबा’च्या पोस्टरवर बिबटय़ाचे छायाचित्र आहे. शहरात राहणारा आणि चुकून शहरात आलेल्या अशा दोन बिबटय़ांच्या प्रवासातून एक वेगळाच आशय मांडण्याचा सुजयचा प्रयत्न आहे. हा चित्रपट थोडासा डॉक्युमेंट्री शैलीने चित्रित के ला आहे, असे सुजयने सांगितले. त्यामुळे केवळ आशय नव्हे तर तंत्राच्या दृष्टीनेही ‘आजोबा’ हा फार वेगळा चित्रपट असेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
‘डॉ. प्रकाश आमटे : द रिअल हिरो’ मी पाहिलेली अद्भुत कहाणी पडद्यावर आणली
– समृद्धी पोरे
प्रकाशवाटा हे पुस्तक वाचून आणि डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांचे हेमलकसा येथील प्रचंड मोठे काम पाहून थक्क झाले. ज्या भागातील आदिवासी माणूस कपडे घालत नव्हता फक्त शिकार करायचा त्या भागात आमटे दाम्पत्याने काम करून आदिवासींमधून डॉक्टर बनविले, त्यांच्या समस्यांवर उपाय शोधले. प्राणी आणि माणूस यांचे उत्तम सहजीवन असू शकते, वाघ अंगणात खेळताना आपण पाहू शकतो. या डोंगराएवढय़ा माणसांचे काम लोकांपर्यंत पोहोचावे. त्यांच्या कामाला मदत व्हावी, सिनेमा पाहून खूप काही प्रेक्षकांना शिकायलाही मिळेल. निसर्ग, माणूस, प्राणी यांचे अद्भुत जीवन आणि त्यांनी केलेले काम लोकांना दाखविण्याची तीव्र इच्छा होती. म्हणून ‘डॉ. प्रकाश आमटे : द रिअल हिरो’ हा चित्रपट मराठी-हिंदी-इंग्रजी तीन भाषांतून केला आहे.