राज्य आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रातील हिंदू खाटीक समाजावर अन्याय केला असून, समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच्या सोडवणुकीबरोबरच इतर मागण्यांप्रश्नी २ एप्रिल रोजी मंत्रालयावर कुटुंबांसह मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप भोपळे आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रमेश इंगवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आझाद मदानापासून निघणाऱ्या या मोर्चात राज्यभरातील १ लाख समाजबांधव सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
ते म्हणाले, १९७८ला तत्कालीन राज्य सरकारने हिंदू खाटीक समाजाचा अनुसूचित प्रवर्गामध्ये समावेश केला, मात्र आजतागायत अनुसूचित जातीच्या लाभापासून आणि अंमलबजावणीपासून हा समाज वंचितच राहिला आहे. या प्रश्नी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, विद्यमान सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याशी चर्चा झाली. मात्र अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी परवाच चर्चा झाली असून, त्यांनी समाजाच्या बहुतांशी मागण्या तत्त्वत: मान्य केले आहेत. मात्र त्याची पूर्तता व्हावी यासाठी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
जातपडताळणीच्या दाखल्यांसाठी होणारी अडवणूक थांबवावी. समाजाच्या सर्वागीण विकासासाठी खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक मार्केटमध्ये बकऱ्यांच्या मंडीसाठी राखीव जागा ठेवावी, कृषी उत्पन्न समितीवर समाजाचा एक प्रतिनिधी घ्यावा, बकऱ्याची चामडी, चर्मोद्योग महामंडळाने हमीभावाने खरेदी करावी, केंद्र सरकारकडून कत्तलखान्यासाठी मिळणाऱ्या शंभर टक्के अनुदानाची योजना ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात राबविण्यासाठी सक्ती करावी, शेळय़ा, मेंढय़ा संस्थांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करावी आदी मागण्यांसाठी आता आरपारची लढाई हाती घेण्यात आल्याचेही भोपळे व इंगवले यांनी या वेळी सांगितले. पत्रकार परिषदेस हातकणंगले तालुकाध्यक्ष प्रमोद इंगवले, यूथ फोर्सचे अध्यक्ष कपिल शेटके, सतीश कांबळे, दयानंद शेटके, शशिकांत शेटके आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2013 रोजी प्रकाशित
हिंदू खाटीक समाजाचा आज कुटुंबांसह मोर्चा
राज्य आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रातील हिंदू खाटीक समाजावर अन्याय केला असून, समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच्या सोडवणुकीबरोबरच इतर मागण्यांप्रश्नी २ एप्रिल रोजी मंत्रालयावर कुटुंबांसह मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप भोपळे आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रमेश इंगवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
First published on: 02-04-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March of hindu butcher society with family on today