मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीच्या सदस्य कॉ. सुमन संझगिरी यांचे मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.  ‘सिटू’ या कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारणी सदस्य, तर मुंबई श्रमिक संघाच्या उपाध्यक्ष होत्या.ज्येष्ठ बंधू कॉ. उमाकांत मोकाशी यांच्या प्रेरणेतून १९४१ साली त्या कम्युनिस्ट चळवळीत सहभागी झाल्या. १९५० साली त्यांचा विवाह कॉ. प्रभाकर संझगिरी यांच्याशी झाला. कॉ. संझगिरी यांच्या सोबतीने सिएट टायर्स तसेच आरसीएफच्या कंत्राटी कामगारांच्या संघटनेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. माकपच्या ‘जीवन मार्ग’ या मुखपत्राच्या संपादक मंडळावरही त्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन पुत्र, कन्या,नातवंडे असा परिवार आहे.