जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक सोमवारी (दि. २० मे) येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित राहणार आहेत.
लोकसभेच्या मागील पाचही निवडणुकांमध्ये या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव होऊन भाजपचा विजय झालेला आहे. सलग पाच वेळेस काँग्रेस पराभूत होत असल्याने यावेळेस ही जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सोडावी अशी त्या पक्षाच्या जिल्ह्य़ातील पुढाऱ्यांची इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे काही स्थानिक पुढारी आपल्या पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत.
या पाश्र्वभूमीवर जालना जिल्हा काँग्रेस कमिटी ही जागा राष्ट्रवादीस सोडण्याच्या विरोधात आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा काँग्रेसकडेच राहील याबद्दल काँग्रेसच्या जिल्ह्य़ातील पुढाऱ्यांना साशंकता नाही. अखिल भारतीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यापूर्वीच जालना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भीमराव डोंगरे यांच्याकडे ही जागा काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगितले आहे.
डोंगरे यांनी सांगितले की, ही जागा राष्ट्रवादीकडे देण्याचा विषयच आमच्याकडे नाही. त्यामुळेच तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षांतर्गत आढावा घेण्यासाठी सोमवारची बैठक आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांचा आढावा या बैठकीत घेण्यात येईल. प्रारंभी सर्व निमंत्रितांच्या उपस्थितीत पक्षाचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतील. त्यानंतर विधानसभा निहाय स्वतंत्र आढावा घेण्यात येईल. जालना लोकसभा मतदार संघातील आजी-माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, जिल्ह्य़ातील पक्षाच्या विविध आघाडय़ांचे अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आदींना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.