महाराष्ट्राचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाटचा दौरा करताना निसर्ग संवर्धन संस्थेच्या मुठवा समुदाय केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्राच्या वतीने परिसरात राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांची माहिती करून घेतली. मुठवा समुदाय केंद्रातील पवन-ऊर्जा हायब्रीड वीज प्रकल्पामुळे बांठिया सर्वाधिक प्रभावित झाले. येथील वनसंवाद केंद्र, झुलता पूल, निलसर्ग संवर्धन केंद्राच्या स्वयंसेवकांनी तयार केलेले पाणवठे आणि मचाणे यांचीही बांठिया यांनी पाहणी केली. मेळघाटात राबविण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरही बांठिया यांनी चर्चा केली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक किशोर रिठे यांच्यासह निसर्ग संवर्धन संस्थेचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.