भारताच्या नकाशावर औद्योगिक वसाहत म्हणून परिचित असणाऱ्या नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या पैशांचा योग्य विनिमय करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बैलबाजार अर्थात गोदाघाट येथे १९३५ मध्ये पार पडलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या स्मृतींसाठी या निधीतून स्मारक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सिंहस्थाकरिता केंद्र व राज्य सरकार यांच्याकडून कोटय़वधी रुपयांचा निधी मिळत असतो, परंतु मागील सिंहस्थात केलेली कामे पुढील सिंहस्थापर्यंत टिकत नसल्याचा नाशिककरांचा अनुभव आहे. २०१४-१५ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या सिंहस्थ अनुदानाची रक्कम एक हजार कोटी रुपये इतकी आहे. या निधीतून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे स्मारक करण्याची सूचना भीमशक्तीने केली आहे.
या स्मारकात अभ्यासिका, होतकरू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, चर्चासत्र सभागृह, काळाराम मंदिर सत्याग्रहाची स्मृतिचित्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित समग्र ग्रंथ, बुद्धधम्माचे लिखित साहित्य, दृकश्राव्य माध्यम साहित्यांची पूर्तता असावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. आजपर्यंत भीमशक्ती सामाजिक संघटनेने महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारात स्मारकाचा मुद्दा मांडण्यात आला असता ही जागा पूररेषेत येते असे कारण देण्यात येत होते, परंतु महानगरपालिकेत ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधारी राजकीय पक्षाने कोटय़वधी रुपये खर्च करून गोदापार्कचा भव्य प्रकल्प उभा करण्याचे जाहीर केले आहे. या गोदापार्कच्या बांधकामापैकी ७० टक्के बांधकाम हे पूररेषेत येणार आहे. जर कोटय़वधी रुपयांचा गोदापार्क महानगरपालिका सर्व नियमांची मोडतोड करून उभारणार असेल तर दलित बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहींचे स्मारक हे त्याच जागी उभारण्याची मागणी कायम राहील.
१९३५ मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे ११ महिने, सात दिवस सुरू होता. त्यामुळे या सत्याग्रहाचे स्मारक न झाल्यास भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर अविनाश आहेर, चंद्रकांत बोंबले, सूर्यकांत आहेर आदींची स्वाक्षरी आहे.