पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांनी ‘मुलींचे कपडे आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार’ याबाबत केलेल्या वक्तव्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया अनेक प्रतिक्रिया येतच आहेत. त्याद्वारे अनेक वाचकांनी पुरुषांना मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला आहे.
मोहिनी लांडे यानी गेल्या आठवडय़ात जाहीर कार्यक्रमात ‘मुलींनो, व्यवस्थित कपडे घाला, नकोसे प्रसंग टळतील’ असे वक्तव्य केले होते. त्याबाबत फेसबुकवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला, पाठोपाठ ईमेल व पत्रानेसुद्धा अनेक वाचकांनी प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. जागेअभावी त्यापैकी अगदीच निवडक प्रतिक्रिया प्रसिद्ध करत आहेत.

रोहिणी ताम्हनकर (सहकारनगर)- महिलांवर दिवसेंदिवस वाढत जाणारे अत्याचार, त्यांचा पेहराव, स्वातंत्र्य हे विषय बरेच चर्चिले गेलेत. पण या मुद्यांच्या मुळाशी जाऊन कुणीही फारसा विचार केलेला दिसत नाही. आज आपण तंत्रज्ञानात, विचारात आणि पेहरावात पाश्चिमात्यांच्या तोडीचे आहोत. हे दाखविण्याची पहिली सुरुवात कपडय़ांच्या अनुकरणापासून होते. सिनेमांबरोबर टीव्ही मालिकांतही स्त्रियांचे जास्तीत जास्त अंगप्रदर्शन कसे होईल हे दाखविण्याची स्पर्धाच लागली आहे. त्याचेच अनुकरण समाजात होताना दिसते. कमी कपडय़ांत वावरणे ही पाश्चिमात्यांची जीवनशैली झाल्यामुळे तिथे स्त्रिया शॉर्ट्स किंवा बिनबाह्य़ांच्या, मोठय़ा गळ्याच्या टीशर्ट मध्ये फिरल्या तरी कुणीही पाहात नाही. कारण तिथल्या पुरुषांची नजर मेलेली असते. पण हे सर्व पाहून आपल्याकडील पुरुषांच्या नजरा मरत नाहीत, तर त्यांच्या भावना चेतवल्या जातात. त्या भावना संस्कारामुळे दबलेल्या राहतात. पण जेव्हा उफाळून येतात तेव्हा समोरच्या स्त्रीने अंगभर कपडे घातले आहेत किंवा नाही, हा मुद्दा गौण ठरतो व ती फक्त स्त्री आहे एवढेच ध्यानात येते. याकरिता सेन्सॉर बोर्डाने कलाकारांच्या पोशाखाबाबत अतिशय कडक नियम केले पाहिजेत. याचा अर्थ फॅशन करू नये असा नाही, पण त्यातही तारतम्य असावे. कारण समाजाने, विशेषत: पुरुषांनी पाश्चिमात्य जगातील स्वत:ला हव्या तेवढय़ाच गोष्टी उचलल्या आहेत, पण स्वत:ची मानसिकता बदललेली नाही.
वासंती सिधये (शुक्रवार पेठ, पुणे) : पिंपरीच्या महापौरांनी मुलींना व्यवस्थित कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे, तो योग्यच आहे. पण फक्त कपडे व्यवस्थित घालून बरेचसे नकोसे प्रसंग टळतील हे खरे नाही, कारण पुरुषी मानसिकता! पुरुष स्त्रीला उपभोग्य वस्तू समजतात तोवर हे प्रसंग चालूच राहणार. मुलींचा कमी झालेला जननदर, विवाहाचे वाढलेले वय आणि विवाहासाठी मुली न मिळणे ह्य़ा कारणांचीही त्यात भर पडली आहे. ४-५ वर्षांच्या मुलींपासून नऊवारी साडी नेसणाऱ्या, घरातच असणाऱ्या वृद्ध स्त्रियांवरही बलात्कार झाले आहेत. तेव्हा त्यांचे वर्तन किंवा फॅशनेबल कपडे हा प्रश्न कुठे येतो? प्रसारमाध्यमांतून होणारा कामुक दृश्यांचा मारा, कथेची गरज म्हणून बोल्ड सीन्स देणारे कलाकार ह्य़ा सर्वावर बंधन घालण्याची
गरज आहे.
अनिकेत मोहिते (सातारा):  अलीकडेच घडलेलं दिल्ली प्रकरण असो वा रोज गावोगावी राजरोसपणे घडत असलेली प्रकरणे असोत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी करीत असणारी वक्तव्ये काळाशी सुसंगत आहेत का? तरुण मुली तोकडे कपडे घालतात यावर आक्षेप असेल तर चिमुरडय़ांचा काय दोष? वयस्कर महिलांचा काय दोष? यावर लोकप्रतिनिधींनी विचार करावा. हे लोक विचार न करता मुलींवर बंधनं घालत सुटले तर मुलींनी रोज साडीच परिधान करायची का? महिलांवरील अत्याचारांचे प्रकार पुरुषसत्ताक मानसिकतेतून तसेच जातीव्यवस्थेतून घडत आहेत. आजकाल तर लहानग्या मुलींनाच ‘टार्गेट’ करायला लागले आहेत, कारण त्यांच्याकडून जास्त विरोध होऊ शकत नाही हे या नराधमांना चांगलेच माहिती आहे. हे सर्व बदलण्याची गरज आहे. स्त्रीमुक्ती ही संकल्पना मनात रुजवून आपल्या घरामधून याची सुरुवात करायला हवी. यासाठी या जाणकार व्यक्तींनी विचारपूर्वक वक्तव्य करायला हवं.