वर्षभरातील विविध स्पर्धा तसेच परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव प्रसिद्ध कवी प्रा. जयराम खेडेकर, प्रा. डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आला.
प्रा. खेडेकर आणि प्रा. तडेगावकर यांनी ‘कथा कवितेला भेटली एक धुंद काव्य मैफल’ हा कार्यक्रम सादर केला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम दिघोळे हे होते. सरचिटणीस कोंडाजीमामा आव्हाड, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील केदार, संचालक सुदाम बोडके, जिल्हा परिषद सदस्य मनीषा बोडके आदी उपस्थित होते.
 प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. बी. खेडकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. सुनील उगले यांनी करून दिला. वार्षिक अहवाल विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. महादेव कांबळे यांनी सादर केला. सूत्रसंचालन प्रा. वैशाली गांगुर्डे, प्रा. तेजस्विता मुंढे यानी केले. आभार विद्यापीठ प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी मानले.