ज्ञानगंगा अभयारण्याच्या दोन वन्यजीव परिक्षेत्रांसह लगतच्या जंगलात पंधराशेहून अधिक वन्यप्राणी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बौद्धपौर्णिमेला झालेल्या वन्यप्राणी प्रगणनेनंतर हा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खामगाव वन्यजीव परिक्षेत्रात आठशे, तर बुलढाणा वन्यजीव परिक्षेत्रात सातशे वन्यप्राणी असल्याचा हा अंदाज आहे. असे असले तरी या अभयारण्यातून बिबटे स्थलांतर करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या अभयारण्यात वीस ते पंचवीस बिबटे असून प्राणी गणनेच्या दिवशी मात्र एकही बिबटय़ा पाणवठय़ाकडे फिरकला नाही. पाणी व भक्ष्याच्या शोधात या बिबटय़ांनी शेजारच्या जंगलांमध्ये स्थलांतर केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात प्रामुख्याने अस्वल, रानडुक्कर, नीलगाई, मोर, माकड, तरस, रानमांजर, भेडकी, ससा, चौशिंगा, कोल्हा, लांडगे, चिंकारा, मसन्याऊद, हरीण, काळवीट या प्राण्यांचा समावेश आहे.
या जंगलात दिडशेवर अस्वलांची संख्या आहे. तीनशेहून अधिक नीलगाई आहेत. रानडुकरांचे अनेक कळप आहेत. मोर आणि लांडोर ७५ हून अधिक, तर २०० हून अधिक ससे असण्याचा अंदाज आहे. असे असले तरी प्राणी गणनेच्या काळात या अभयारण्यातील बिबटे अचानक गायब झाले आहेत.
अभयारण्यात बिबटय़ांच्या भक्ष्य व पाण्याची मारामार होत असल्याने ज्या ठिकाणी ही व्यवस्था मुबलक आहे, त्या ठिकाणी या बिबटय़ांनी स्थलांतर केले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेजारच्या अजिंठा पर्वत रांगांमधील सावळतबारा खोऱ्यात किंवा सातपुडय़ातील जंगलात या बिबटय़ांनी धाव घेतली असावी, असा अंदाज आहे. मात्र, या अंदाजाला वन्यजीव विभागाचे अधिकारी खरे मानत नाहीत. त्यांच्या मते, हे बिबटे ज्ञानगंगा अभयारण्यातच असून गणनेच्या दिवशी त्यांनी अगोदरच भक्ष्य भक्षण करून पाणी प्याल्याने ते पाणवठय़ाकडे फिरकले नाहीत. आता वन्यजीव विभाग या बिबटय़ांचा शोध घेऊन त्यांची संख्या व स्थळ निश्चित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी भगत यांनी सांगितले.